क्रीडा

कोहलीच्या बादशाहीने पाकिस्तानला ६ विकेट्सने धूळ चारली!

संपूर्ण जगाच्या नजरा कोहलीच्या शतकाकडे लागल्या होत्या.


स्वप्नील सासणे : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचा विजयी प्रवास सुरूच आहे. आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 6 विकेट्सने धूळ चारली आणि उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा दमदार प्रदर्शन करत 242 धावांचे लक्ष्य सहज गाठले. या विजयाचा नायक ठरला विराट कोहली, ज्याने जबरदस्त शतक झळकावून बाकी संघांसाठी इशारा दिला. दुसरीकडे, यजमान पाकिस्तानला घरच्या मैदानावर पहिल्याच फेरीत गारद होण्याची वेळ आली आहे.

दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली

भारतीय संघाला सुरुवातीला विकेट मिळवण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली. बाबर आझम (23) ने काही अप्रतिम फटके मारून पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, हार्दिक पंड्याने बाबरला बाद करताच, पुढच्याच षटकात इमाम-उल-हकही तंबूत परतला. यामुळे पाकिस्तान अडचणीत आला होता, पण कर्णधार मोहम्मद रिझवान (46) आणि सऊद शकील (62) यांनी संयमी खेळी करत संघाला सावरले. दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली.

मात्र, त्यांची फलंदाजी संथ होती, त्यामुळे पाकिस्तान मोठा स्कोर उभारू शकला नाही. सऊद शकीलने अर्धशतक झळकावले, पण रिझवान त्यापासून दूर राहिला. शेवटी खुशदिल शाह (38) ने काही मोठे फटके मारून संघाला 241 धावांपर्यंत पोहोचवले. भारतासाठी कुलदीप यादवने 3, तर हार्दिक पंड्याने 2 विकेट्स घेतल्या.

कोहलीच्या शतकाने भारताला दिला विजय

भारतीय संघाने सावध सुरुवात केली. शुभमन गिल बाद झाल्यानंतर विराट कोहलीने आपल्या परिचित शैलीत खेळत डाव सावरला आणि अप्रतिम अर्धशतक झळकावले. दुसऱ्या बाजूने सुरुवातीला संघर्ष करणाऱ्या श्रेयस अय्यरनेही (56) लय पकडली आणि पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलेच धोपटले. अय्यरने वेगाने अर्धशतक पूर्ण केले, मात्र त्यानंतर तो बाद झाला.

संपूर्ण जगाच्या नजरा कोहलीच्या शतकाकडे लागल्या होत्या. अखेरीस त्याने चौकार मारत शतक पूर्ण केले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीकडे मोठे पाऊल टाकले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button