सोलापूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळासाठी असणारे जिल्हेही यंदा अतिवृष्टीच्या विळख्यात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांना मदत करणे ही राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे ठाम मत पवारांनी व्यक्त केले. त्यांनी केंद्राच्या योजनांतून मदत करण्याची सूचना राज्य सरकारला केली. पुढील चार दिवसही जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, त्यांच्या अंदाजानुसारच परिस्थिती विकसित होत असल्याचे पवारांनी सांगितले.
आपण दुष्काळ पाहिला आहे, पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. नेहमी कमी पाऊस असणाऱ्या सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत यंदा पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने इशारा दिला की, पीक वाहून गेले तर त्या वर्षीचे नुकसान होते. पण जमीनच वाहून गेली, तर त्या जमिनीची उत्पादकता कायमची कमी होते.त्यामुळे फक्त पिकांसाठी आणि जमिनीसाठीही शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत. राज्यातील शेतकरी संकटात असताना पवारांचे हे वक्तव्य महत्त्वाचे ठरत असून, सरकार पुढे कसे निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
