सांगोला तालुक्यात अवैध धंद्यांचा उघडस्फोट; पो.नि.घुगे कंबरडे मोडणार का?

सांगोला / प्रतिनिधी : सांगोला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या विविध अवैध व्यवसायांना अक्षरशा ऊत आला असून पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. खासगी सावकारकी, मटका, अवैध दारू विक्री, गुटखा, वाळू तस्करी अशा अनेक बेकायदेशीर व्यवसाय आता उघडपणे सुरु आहेत.
या व्यवसायांमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, हे धंदे दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, पोलिस अधिकारी दिसताच काही वेळ या धंद्यांवर ब्रेक लागतो; मात्र अधिकारी निघून गेल्यावर ते पुन्हा सुरू होतात. त्यामुळे पोलिस प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल स्थानिकांन कडून उठत आहे.
सांगोला शहरातील आणि ग्रामीण भागातील पोलीस बीट क्षेत्रात बहुधा अनुपस्थित असतात. यामुळे अवैध धंदे चालकांना मुक्तसंचार करण्याची संधी मिळत असल्याची चर्चा आहे. “पोलीस फक्त हफ्ता घेण्यासाठी येतात का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पोलीस निरीक्षक घुगे यांनी अवैध धंद्यांवर कारवाईसाठी विशेष पथक स्थापन केले आहे. मात्र कारवाई ठराविक ठिकाणी आणि अर्थपूर्ण वाटाघाटींवर केंद्रित होत आहे का ? या पथकातील काही अधिकाऱ्यांची कार्यपद्धती मनमानी स्वरूपाची असून, त्यांच्या खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सांगोला शहराबरोबरच संपूर्ण तालुक्यात वाढत चाललेल्या या बेकायदेशीर धंद्यांना रोखण्यासाठी पो.नि.घुगे यांची कारवाई किती प्रभावी ठरणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.