सोलापूर/प्रतिनिधी: “मी निवडून आलो असतो, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते,” असं वादग्रस्त विधान करत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्वतःच्या पराभवाचे अनोखे लॉजिक समोर ठेवलं आहे. याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे, तानाजी सावंत यांच्यावरही थेट टीका केली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना शहाजीबापूंनी म्हटलं, “महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही. मी 1995 ला निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. 2019 ला निवडून आलो, तेव्हा उद्धव ठाकरे व नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यंदाही मी निवडून आलो असतो, तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते.”
उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर नाराजी
“गंगेचा उगम शंकराच्या जटेतून झाला, म्हणून ती पवित्र आहे. तसंच शिवसेनेचा उगम बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून झाला, त्यामुळे तीही पवित्र आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना मागे पडली. सोलापूर जिल्ह्यात पक्षाची सूत्रं दुसऱ्यांकडे गेली आणि त्यामुळे पीछेहाट झाली,” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केला.
“उद्धव ठाकरेंच्या हाताला आयोडेक्स लावायची वेळ आली होती”
शिंदेंच्या कामगिरीचं कौतुक करताना पाटील म्हणाले, “राज्यात लोक म्हणतात की एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. मागील दोन वर्षांत त्यांनी खूप मेहनत घेतली. पवार साहेबांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार निवडून आले. उद्धव ठाकरेंच्या हाताला तर आयोडेक्स लावायची वेळ आली होती, पण त्यांना यश मिळालं नाही.”
तानाजी सावंतांवरही टीकास्त्र
शिंदे गटाचेच एक मंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका करताना शहाजीबापूंनी म्हणाले, “तानाजी सावंत शिक्षण संस्था चालवतात, कारखाने आहेत, आणि अजून काही खरेदी करायचे आहेत. त्यामुळे पक्ष कामात त्यांचं लक्ष नाही.” यामुळे शिंदे गटातील अंतर्गत कुरबुरी पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत.
दरम्यान, तानाजी सावंत सध्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा असून, धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याला पाठ न फिरवल्यामुळे सावंत यांच्या नाराजीची चर्चा अधिक गडद झाली आहे.
