पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाची आत्महत्या; घटना कॅमेऱ्यात कैद

पहलगाम / प्रतिनिधी: पोलिसांच्या ताब्यातून सुटून नदीत उडी घेतली; दहशतवाद्यांना अन्न व रसद पुरवल्याची कबुली दिली होती. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, संबंधित दहशतवाद्यांना रसद आणि अन्न पुरवणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने पोलिसांच्या ताब्यातून सुटून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना संपूर्णपणे कॅमेऱ्यात कैद झाली असून, संबंधित व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला जम्मू-काश्मीर पोलिसांनी 3 मे रोजी ताब्यात घेतले होते. प्राथमिक चौकशीत त्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी झालेल्या अतिरेक्यांना मदत केल्याची कबुली दिली होती. “दहशतवादी कुठे लपले आहेत हे मी दाखवतो,” असे सांगत त्याने पोलिसांना सहकार्याची तयारी दर्शवली होती.
पोलीस त्याला हल्ल्याच्या ठिकाणाहून पुढे दहशतवाद्यांच्या तळावर घेऊन जात असताना, तरुण अचानक पळाला व विश्वा नदीत उडी घेतली. यात त्याचा मृत्यू झाला. सुरक्षा यंत्रणांसाठी तो एक महत्त्वाचा पुरावा मानला जात होता, परंतु त्याच्या आत्महत्येमुळे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची कडी तुटली आहे.
तपास यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू
या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून, तरुणाचाआत्महत्येमागील नेमकी पार्श्वभूमी व हेतू समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याने दिलेली माहिती खरी होती का, की फसवणूक करण्याचा प्रयत्न, याचा तपास सुरू आहे.