Big Braking : आमचा जीव घेता का जीव? विकास कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधींना नागरिकांची आर्तहाक!
अर्धवट रस्त्याच्या कामामुळे भीषण अपघात, तरुण गंभीर जखमी

सांगोला/ प्रतिनिधी : सांगोला शहरातील मिरज-महूद रेल्वे स्टेशन पाठीमागील जुना बायपास रोडवर आज ८ च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या रस्त्यावर विकासकामाच्या नावाखाली १० ते २० फूट खोल खड्डा खोदून ठेवण्यात आला असून काम अर्धवट सोडून ठेकेदार फरार झाला आहे. या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे प्राण धोक्यात आले आहेत.

खड्ड्यात वाहन आदळल्याने तरुण गंभीर जखमी
सायंकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास एक दुचाकीस्वार तरुण या खड्ड्यात भरधाव वेगाने आदळला. अपघात इतका जबरदस्त होता की तरुणाला गंभीर दुखापत झाली असून तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
लाइट बंद, अपूर्ण कामामुळे वारंवार अपघात
या भागातील नागरिकांनी सांगितले की, “रस्त्यावर प्रकाशव्यवस्था नाही, काम अर्धवट आहे आणि कोणतीही सूचना फलक लावलेले नाहीत. त्यामुळे अपघात होणे अटळ ठरत आहे.” याआधीही इथे ४-५ अपघात घडले आहेत.

ठेकेदार फरार, नेत्यांचे दुर्लक्ष
“ठेकेदार अर्धवट काम सोडून पळून गेला असून, स्थानिक प्रशासन आणि राजकीय नेते झोपले करत आहेत,” असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. “विकासकामाच्या नावाखाली लाखोंचा निधी आणि टक्केवारी वापरून अपूर्ण काम करणे आणि त्यातून सामान्य नागरिकांचे प्राण धोक्यात घालणे ही गंभीर बाब आहे,” असे नागरिकांनी सांगितले.

नातेवाईकांचा संताप
अपघातग्रस्त तरुणाच्या नातेवाईकांनी सांगितले की, या भागात गेल्या अनेक दिवसांपासून खड्डा खोदून तसाच ठेवण्यात आला आहे. ना काम पूर्ण होतं ना सुरक्षेची काळजी घेतली जाते. हे काम एखाद्या दिवशी एखाद्याचा जीव घेईल, याची आम्हाला भीती वाटते होती आणि आज ते खरं ठरलं.
या गंभीर परिस्थितीवर प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा निष्काळजीपणामुळे आणखी निष्पाप जीव गमवावे लागतील.