
सोलापूर : अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील आठ मंडलांतील सुमारे ४१ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल प्रशासनाने कृषी व महसूल विभागा यांच्यामार्फत पंचनाम्याचे आदेश दिले असून संबंधित भागात पंचनामे सुरू झाले आहेत.
जिल्ह्यात सरासरी २७६.२ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. ओला दुष्काळ असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एप्रिल-मे महिन्यातील अवकाळी पावसानेच द्राक्ष, केळी यांसारख्या फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले होते. जिल्ह्यात एकूण साडेचार लाख हेक्टरवर खरीप पेरणी झाली असून त्यापैकी ४१ हजार हेक्टर पिके उध्वस्त झाली आहेत.
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील ८ मंडलांतील ८८ गावांवर अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. सोयाबीन, तूर, मुग, उडीद, मका, भाजीपाला व फळपिके ही प्रमुखपणे बाधित झाली आहेत.
मरवडे, मारापूर, मंगळवेढा, भोसे, हुलजंती, बोराळे, पिलीव, महाळुंग, लवंग, अकलूज, नातेपुते, दहिगाव, सदाशिवनगर, माळशिरस, संगेवाडी, कासेगाव, तुंगत, चळे, पाटकूल, करकंब, भंडीशेगाव, पंढरपूर, केत्तुर, उमरड, कोर्टी, सालसे, जेऊर, केम, करमाळा, अर्जुननगर, रांझणी, वाघोली, तडवळ आदी ३४ मंडलात शंभर मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे.
सोलापूरच्या शेतीसमोरील ही बिकट परिस्थिती लक्षात घेता बळीराजा शासनाकडून तातडीने मदतीची मागणी केली आहे.