विशेष प्रतिनिधी: राज्यातील हवामानात प्रचंड चढ-उतार सुरू असून, एकीकडे 40 अंश सेल्सियसवर पोहोचलेला उकाडा आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांबरोबरच शेतकरीही हैराण झाले आहेत.
नाशिक शहरासह परिसरात जोरदार विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने दोन दिवसांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही तासांतही मुसळधार सरी येण्याची शक्यता वर्तवली आहे. या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्यातील इतर भागांत मात्र तापमानाचा पारा चढलेला असून अनेक ठिकाणी 40 अंशाच्या पुढे तापमान गेले आहे. यामुळे वातावरणात प्रचंड दडपण निर्माण झाले आहे.
मान्सूनचं आगमन लवकर?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 27 मेच्या सुमारास केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. ही तारीख सरासरीपेक्षा चार दिवस आधीची असून, त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून 10 ते 15 जूनदरम्यान पोहोचू शकतो. यंदा पूर्वमोसमी वारे व ढगांच्या हालचालींमुळे मे महिना तुलनेत आल्हाददायक जाण्याची शक्यता आहे.
उष्णता आणि उकाड्याचा जोर कमी होण्याची शक्यता
पुढील 15 दिवसांत म्हणजे 25 मेपर्यंत कमाल व किमान तापमान सरासरीच्या खाली राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे दिवसा उष्णतेचा तडाखा आणि रात्री उकाडा फारसा जाणवणार नसल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
