Happy Holi 2025 : देशभरात होळीचा उत्साह, जाणून घ्या कशी झाली सुरुवात
होळीमध्ये जात, धर्म, वर्ग आणि सामाजिक स्थिती असा कोणताही भेदभाव नसतो

रोहित हेगडे : देशभरात रंगांची उधळण करणारा होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सणामागील पौराणिक कथा आणि परंपरेला विशेष महत्त्व आहे. रंगांच्या होळीची परंपरा भगवान श्रीकृष्णाशी जोडली जाते. आपल्या गडद रंगामुळे राधा आणि गोपिका आपल्यावर प्रेम करतील की नाही, अशी शंका कृष्णाला होती. तेव्हा यशोदा मातेने कृष्णाला राधा आणि तिच्या सखींवर रंग टाकण्याचा सल्ला दिला. या परंपरेतूनच रंगांच्या होळीचा उत्सव सुरू झाला, असे मानले जाते. वृंदावन, मथुरा, बरसाना आणि नंदगाव येथे ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात पाळली जाते.
होळी साजरी करण्याची पद्धत :
होळीचा सण दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते, ज्यामध्ये लोक लाकडे आणि शेणाच्या गौऱ्या पेटवतात. होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते, ज्यामध्ये लोक एकमेकांना रंग आणि गुलाल लावतात. होळीच्या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जाऊन भेटतात आणि मिठाई वाटतात. होळीचा सण एकता आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे. हा सण आपल्याला नेहमी वाईटावर चांगल्याच्या विजयाला पाठिंबा देण्यास शिकवतो.
अमेरिकेच्या “या” महिला अधिकाऱ्यावर चीन का झाले फिदा?
होळीची पौराणिक कथा :
होळीशी संबंधित सर्वात प्रसिद्ध कथा भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूची आहे. हिरण्यकश्यपू हा एक अहंकारी राजा होता, ज्याने स्वतःला देव मानले होते आणि सर्वांनी त्याची पूजा करावी, अशी त्याची इच्छा होती. पण त्याचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता. हिरण्यकश्यपूनं त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी प्रल्हाद वाचला. शेवटी हिरण्यकश्यपूनं आपली बहीण होलिकाला प्रल्हादला मारण्याचा आदेश दिला. होलिकाकडे एक वस्त्र होतं, ज्यामुळे ती आगीत जळू शकत नव्हती. ती प्रल्हादला घेऊन आगीत बसली, पण भगवान विष्णूच्या कृपेने ती स्वतः जळून राख झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. या घटनेच्या स्मरणार्थ होळीचा सण साजरा केला जातो आणि रंगांच्या होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते.
होळीचा सामाजिक अर्थ :
होळीचे सर्वात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे यात जात, धर्म, वर्ग आणि सामाजिक स्थिती असा कोणताही भेदभाव नसतो. प्रत्येकजण एकमेकांना रंग लावतो आणि “बुरा न मानो, होली है” म्हणत आनंदाने सण साजरा करतो. होळीच्या सणाने जात, धर्म, वर्ग, श्रीमंती-गरीबी यांसारख्या भिंती तुटतात आणि प्रत्येकजण समान रीतीने या सणाचा आनंद घेतो. त्यामुळे होळी हा सामाजिक बंध मजबूत करण्याचा सण मानला जातो.