राज्यात सायबर फसवणुकीचा वाढता धोका,नागरिकांचे ७,६०० कोटींचे नुकसान
सध्या राज्यात एकूण ५० सायबर पोलीस ठाणे कार्यरत आहेत.

मुंबई : डिजिटलायझेशनला वेग मिळत असतानाच राज्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक माहिती दिली. गेल्या वर्षभरात राज्यातील नागरिकांची तब्बल 7,600 कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील ४३ सायबर लॅब तंत्रज्ञानयुक्त गुन्हे अन्वेषण केंद्रांना सायबर पोलीस ठाणे म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या राज्यात एकूण ५० सायबर पोलीस ठाणे कार्यरत आहेत.पुण्यात ‘Centre of Excellence in Digital Forensic’ ही अत्याधुनिक न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.
मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि नांदेड येथील प्रयोगशाळांमध्ये आधुनिक संगणक गुन्हे विभाग कार्यरत आहेत.
नवी मुंबईतील सायबर मुख्यालयात ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प‘ हा जागतिक स्तरावरील अत्याधुनिक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नोडल सायबर पोलीस स्टेशनसह सहा प्रमुख विभाग कार्यरत आहेत.मात्र, पोलीस दलाला आवश्यक मनुष्यबळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करूनही सायबर फसवणुकीचे प्रकार वाढतच आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले .
महाराष्ट्रासह १४ राज्यांमध्ये हवामानाचा तडाखा, IMD दिला इशारा
उच्च न्यायालयाचा पोलिसांना दणका
मुंबई उच्च न्यायालयानेही राज्यातील पोलिसांना फटकारले आहे. सायबर फसवणुकीच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
“सायबर गुन्ह्यांमध्ये वेळ हीच कळीची बाब असते. पोलिसांनी तक्रारींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा पीडितांचे मोठे नुकसान होऊ शकते. मात्र, पोलिसांकडून अपेक्षित वेगाने काम होत नाही. त्यामुळे त्वरित सुधारणा करा,” असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.
सायबर फसवणुकीच्या तक्रारी कुठे कराल?
जर तुम्ही सायबर फसवणुकीचा शिकार झाला असाल, तर तक्रार दाखल करण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत :
जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्या.
राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल: https://cybercrime.gov.in/ येथे तक्रार ऑनलाइन दाखल करता येते.
सायबर हेल्पलाइन क्रमांक: 155260 वर कॉल करून तक्रार नोंदवा.
फसवणुकीचा ई-मेल, मेसेज, लिंक किंवा कॉल आल्यास: www.reportphishing.in वर महाराष्ट्र सायबरच्या पोर्टलवर तक्रार करा. राज्यात सायबर सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याची गरज आहे. नागरिकांनीही स्वतःची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.