महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी लवकरच शासकीय जागा – अजित पवार यांची ग्वाही

डॉ. बसवराज बगले यांचा आंदोलनाचा इशारा; पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी सक्रीय
मंगळवेढा / प्रतिनिधी: मंगळवेढ्यात जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी लवकरच शासकीय जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ. बसवराज बगले गेली नऊ वर्षे स्मारकाच्या उभारणीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. सुरुवातीला कृषी विभागाच्या जमिनीत स्मारकाची संकल्पना होती, परंतु ती जमीन बीज गुणन प्रक्षेत्राची असल्याने सार्वजनिक उपक्रमासाठी वापरता येत नसल्याचा अडसर निर्माण झाला. त्यामुळे बगले यांनी कृष्ण तलावालगतची शासकीय जमीन स्मारकासाठी देण्याची मागणी केली होती.
प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित
तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी सदर जमीन स्मारकासाठी उपयुक्त असल्याचा सकारात्मक अहवाल सादर केला असतानाही, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तीन वर्षांपासून निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉ. बगले यांनी येत्या बसवजयंतीपासून सोलापूर येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना दिली होती.
प्रशासनाची हालचाल सुरू
या इशाऱ्याची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २२ एप्रिल रोजी पंढरपूर येथे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांची बैठक झाली. पालकमंत्री गोरे यांनी यासाठी लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईत व्यापक बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
स्मारकाचा आराखडा सादर
कृष्ण तलाव परिसरात जल पर्यटन, अनुभव मंडप, प्रार्थनागृह, वचन साहित्य भांडार, ध्यानगृह, शिल्पदालन, पर्यटक निवास, वाचनालय, सांस्कृतिक भवन, आरोग्य सुविधा, महात्मा बसवेश्वरांचा भव्य पुतळा, नौकाविहार यांचा समावेश असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा सविस्तर आराखडा डॉ. बगले यांनी सादर केला आहे.
प्राथमिक टप्प्यात १५ हेक्टर जमीन आवश्यक
या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात तलावासह १५ हेक्टर शासकीय जमीन स्मारक समितीकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल प्रशासनाला स्मारकाचा अंतिम आराखडा तयार करून संबंधित विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र तातडीने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.राजकीय पाठिंबा वाढतोय
या मागणीसाठी आमदार डॉ. विनय कोरे, समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष पवार, ॲड. शिवानंद पाटील, सिध्देश्वर कोरे, आनंद मुस्तारे आदी नेते सक्रियपणे पाठपुरावा करत आहेत. दरम्यान, डॉ. बगले यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनही हालचालीला गती देत असून लवकरच महात्मा बसवेश्वर स्मारकाचे स्वप्न साकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.