महाराष्ट्र

खवय्यांसाठी आनंदाची बातमी! शाकाहारी आणि मांसाहारी थाळी झाली स्वस्त;


मार्चमध्ये घरगुती पदार्थ स्वस्त झाल्याने शाकाहारी आणि मांसाहारी थाळी देखील स्वस्त झाली आहे. खवय्यांसाठी ही मोठी गुड न्यूज ठरली आहे. टोमॅटो, कांदा, बटाटा आणि चिकन दरात घट झाल्यामुळे ही किंमत कपात झाली आहे.

Veg and Non-Veg Thali |मार्च 2025 मध्ये देशातील खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे शाकाहारी आणि मांसाहारी थाळ्यांचे दर कमी झाले आहेत. क्रिसिल इंटेलिजन्सच्या अहवालानुसार, घरगुती शाकाहारी थाळी 2 टक्क्यांनी स्वस्त झाली असून मांसाहारी थाळीच्या दरात तब्बल 5 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना महागाईपासून थोडासा दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा मार्च महिन्यात शाकाहारी थाळीतील मुख्य घटक असलेल्या टोमॅटो, बटाटा आणि कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत टोमॅटोचे दर 8 टक्क्यांनी, बटाट्याचे 7 टक्क्यांनी आणि कांद्याचे 5 टक्क्यांनी कमी झाले आहेत. या तिन्ही वस्तूंच्या किमतीत घट झाल्यामुळे थाळी स्वस्त झाली आहे.

घरगुती बजेटमध्ये दिलासा-

विशेषतः टोमॅटोच्या किमतीत वार्षिक आधारावर मोठी घसरण झाली असून मार्च 2024 मध्ये 32 रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो मार्च 2025 मध्ये 21 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. ही 34 टक्क्यांची घसरण देशभरातील उत्पादनात 29 टक्क्यांनी झालेल्या वाढीमुळे झाली आहे. दक्षिण भारतात चांगले हवामान आणि जलसाठ्याची परिस्थिती लाभदायक ठरली असून त्याचा परिणाम उत्पादनात वाढ म्हणून दिसून आला.

मांसाहारी थाळीबाबत बोलायचं झाल्यास, ब्रॉयलर चिकनच्या किमतीतही जवळपास 7 टक्क्यांची घट झाली आहे. उत्तर भारतात चिकनचा पुरवठा वाढला आहे, तर दक्षिण भारतात बर्ड फ्लूच्या भीतीमुळे मागणी कमी झाली आहे. त्यामुळे मांसाहारी थाळीही आता खवय्यांसाठी अधिक परवडणारी ठरतेय.

शाकाहारी थाळीच्या दरात 3 टक्के घट

तरीही, शाकाहारी थाळीच्या दरात आणखी मोठी घसरण होऊ शकली नाही, कारण वनस्पती तेल, बटाटा आणि कांद्याच्या दरात अनुक्रमे 19 टक्के, 2 टक्के आणि 6 टक्क्यांची वाढही नोंदली गेली आहे. या घटकांनी काही प्रमाणात किंमती स्थिर ठेवल्या.

गेल्या वर्षीच्या तुलनेतही यंदा शाकाहारी थाळीच्या दरात 3 टक्के घट झाली असून मांसाहारी थाळीचे दर मात्र स्थिर राहिले आहेत. त्यामुळे मार्च 2025 मध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईपासून सामान्य माणसाला दिलासा मिळाल्याचे स्पष्ट होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button