सांगोला / प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात आदर्श ठरलेल्या स्व. गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांचे स्मारक विधिमंडळाच्या आवारात उभारावे, अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. ना. राहुलजी नार्वेकर यांची नुकतीच भेट घेतली.
या भेटीत आमदार डॉ. देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांचे स्मारक विधिमंडळ आवारात उभारण्याबाबतचे अधिकृत पत्र अध्यक्षांना सादर केले. यावर विधानसभा अध्यक्षांनी तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, विधिमंडळाचे प्रधान सचिव जितेंद्र भोळे यांना संबंधित कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
गणपतराव देशमुख यांचा सात दशकांचा लोकाभिमुख आणि लोकशाहीवादी राजकीय प्रवास पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे, असे सांगून आमदार देशमुख यांनी स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे कार्य व योगदान जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली.
