बीड : परळी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जलालपूर भागात 10 ते 12 जणांच्या टोळक्याने एका तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर काठी आणि बेल्टने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू” अशी धमकी देत टोळक्याने तरुणाला निर्दयपणे मारहाण केली. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तींची झलक दिसून आली आहे. काही वर्षांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. त्यानंतर बीडमध्ये अनेक गुन्हेगारी घटना समोर आल्या. आता पुन्हा अशाच प्रकारे अमानुष मारहाणीची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
परळीतील जलालपूर येथे एका कार्यक्रमात वाद झाल्यानंतर, संबंधित तरुणाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन टोळक्याने त्याला अमानुषपणे मारहाण केली. विशेष म्हणजे, घटनेनंतर बराच वेळ उलटूनही पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती.
पीडित तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
