सोलापूर जिल्ह्यातील पहिला शिलालेख : यादव राजा महादेवराव यांचे मंदिर दान
कल्याणीचे चालुक्य, मंगळवेढ्याचे कलचुरी, अक्कलकोटचे शिलाहार, द्वारसमुद्रचे होयसळ, देवगिरीचे यादव इ. विविध राजघराण्यांची सत्ता होती

सांगोला/महेश लांडगे : यादव राजा महादेवराव यांच्या कारकिर्दीतील सोलापूर जिल्ह्यात सापडलेला पहिला शिलालेख प्रकाशझोतात आला आहे. सांगोला तालुक्यातील महिम गावातील एसटी बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या एका भिंतीवर हा शिलालेख आडवा ठेवलेला आहे.
हा शिलालेख इसवी सन १२६९ मधील असून, त्यावर कोरीव अक्षरात यादव राजा महादेवराव यांनी मंदिरासाठी दिलेल्या २० गद्यान दानाची नोंद आहे. शक ११९१, ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा (९ जुलै १२६९, शुक्रवार) या तारखेला हा लेख कोरल्याचा उल्लेख आहे.
शिलालेखाचे वैशिष्ट्ये आणि भाषा
गावचे नाव : मु पो.महिम ता. सांगोला जि.सोलापूर
शिलालेखाचे वाचन
१.ॐ स्वस्तिश्री साकु ११९१
२.सुक्ल सवंछरे जेष्ठा अद्या(द्यौ?)
३.प्रतिपदा सुक्रे स्रिमहा
४.राजाधिराजा परमेस्वर
५.द्वारावतिपुरवराधिस्व
६.र विष्णुवंसोद्भव ज[जा]दव
७.कुलकमलकलिकाविका
८.स भास्कर स्रीxxx
९.प्रौढप्रतापचक्रवर्ति श्री
१०.महादेव विजयराज्ये त
११.दपादपद्मोपि…
ओळ क्रमांक १२ ते २० मधील वाचन
संशोधन पेपर मधे सदर होईल
१७ ……………………. कम
१८. तु पटे पहिचे ग २० भुमि निव
१९. र्तने …………
२०. स्वदत्तां परदत्तां वा
२१. यो हरेत वसुंधरां
२२.षष्टिवर्ष सहस्राणि
२३.विष्ठायां जायते कृमि
Pune Rape Case : बसचा वाहक असल्याची बतावणी करत आरोपीने केला अत्याचार
शिलालेखाचा अर्थ
शालिवाहन शकाच्या शक ११९१ व्या वर्षी शुक्ल नाम सवत्सरात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा शुक्र म्हणजेच ९ जुलै १२६९ शुक्रवार या दिवशी द्वारका नगरीचा राजा असलेल्या परमेश्वर भगवान विष्णूचा वंशज असलेल्या यादव कुळातील महादेवराव यादव याने २० गद्यान मंदिरासाठी दान दिले. हे दान कोणी मोडेल किंवा चोरी करेल स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां..’ अशी सुरुवात असणारे प्रसिद्ध शापवचन आलेले आहे तसेच तो ६० हजार वर्षे विष्टेतील किडा बनून राहील अशी शापवाणी लेखाच्या शेवटी कोरलेले आहे . लेखाच्या सुरुवातीस सूर्यचंद्र आणि गाय वासरू तसेच राजसत्तेचे प्रतिक म्हणून तलवार कोरलेली असून सुरुवातीस यादव राजा महादेवाची प्रशस्ति आलेली आहे. महादेव राजाच्या काळातील एका मंदिरास २० गद्यान दानाची नोंद हा शिलालेखाचा मुख्य विषय आहे. सोलापूर जिल्ह्यावर मध्ययुगीन काळात कल्याणीचे चालुक्य, मंगळवेढ्याचे कलचुरी, अक्कलकोटचे शिलाहार, द्वारसमुद्रचे होयसळ, देवगिरीचे यादव इ. विविध राजघराण्यांची सत्ता होती. जिल्ह्याच्या राजकीय अभ्यासाच्या दृष्टीने सदर शिलालेख महत्वाचा आहे.
यादव राजा महादेवाच्या काळातील सोलापूर जिल्ह्यात सापडलेला हा पहिलाच शिलालेख आहे.
जी.पी.एस.:-N.17.6475554, E.75.1084097
शिलालेखाचे स्थान : माहीम गावातील एस टी बस स्थानकाच्या पाठीमागे भिंतीला आडवा ठेवला आहे . तर दुसरा तुटलेला तुकडा शाळेजवळ आहे
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषाः देवनागरी लिपीतील मराठी संस्कृत मिश्र भाषेत कोरला आहे
प्रयोजनः मंदिरास भूमी व दान देऊन मंदिर बांधल्याची स्मृती जपणे.
मिती/वर्ष: शके ११९१ शुल्क नाम सवत्सर जेष्ठ शुद्ध प्रतिपदा
काळ वर्ष : १३वे शतक – ९ जुलै सन १२६९
राजवट/राजा : यादव काळ.महादेवराव यादव
व्यक्तिनामः महादेवराव यादव
शिलालेखाचे संशोधक : श्री. नितीन अन्वेकर
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल दुधाणे, श्री अथर्व पिंगळे
शिलालेखाचा ऐतिहासिक महत्त्व
महादेवराव यादव यांच्या काळातील सोलापूर जिल्ह्यात सापडलेला हा पहिलाच शिलालेख आहे. सोलापूर जिल्ह्यावर कल्याणीचे चालुक्य, मंगळवेढ्याचे कलचुरी, अक्कलकोटचे शिलाहार, द्वारसमुद्रचे होयसळ आणि देवगिरीचे यादव या विविध राजघराण्यांची सत्ता होती.
महादेवराव यादव : एक महान शासक
महादेवराव यादव हे दयाळू, शूर आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या राज्यात मराठी भाषेला अधिकृत राजभाषेचा दर्जा दिला. त्यापूर्वी संस्कृत आणि कन्नड भाषा राजकारभारासाठी वापरल्या जात होत्या.
त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकास मोठ्या प्रमाणावर झाला.
संशोधक आणि अभ्यासकांचे मत
या शिलालेखाचा अभ्यास संशोधक श्री. नितीन अन्वेकर, श्री. अनिल दुधाणे आणि श्री. अथर्व पिंगळे यांनी केला आहे.
शिलालेखाचे स्थान आणि संरक्षणाची गरज
हा शिलालेख सांगोला तालुक्यातील महिम गावात, एसटी बस स्थानकाच्या पाठीमागील भिंतीवर आहे. मात्र, शिलालेखाची काही अक्षरे झिजली आहेत, काही खड्डे पडले असून काही भाग तुटलेला आहे. तुटलेला तुकडा गावातील शाळेजवळ ठेवलेला आहे.
इतिहासप्रेमी आणि प्रशासनाकडून संवर्धनाची मागणी
इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांनी या शिलालेखाचे योग्य संवर्धन करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. या ऐतिहासिक शिलालेखाचे संरक्षण आणि संवर्धन झाल्यास, तो यादव राजवंशाच्या इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल.