दिल्ली / प्रतिनिधी: गेल्या आठ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही देशांनी आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धबंदी (सीजफायर) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ही अधिकृत घोषणा केली.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव शिगेला पोहोचला होता. त्यानंतर 7 मे रोजी भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यामुळे दोन्ही देशांमध्ये गोळीबार आणि हवाई हल्ल्यांची सुरुवात झाली होती. मात्र आता या संघर्षाला पूर्णविराम मिळाल्याने सीमारेषेवर शांतता प्रस्थापित होण्याची अपेक्षा आहे.
डीजीएमओ पातळीवर ठरला निर्णायक निर्णय
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “पाकिस्तानचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (DGMO) यांनी आज दुपारी ३.३५ वाजता भारतीय समकक्षांशी फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही देशांनी संध्याकाळी ५ वाजल्यापासून जमिनीवर, हवेत व समुद्रात होणारे सर्व प्रकारचे हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सैन्याला तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत.”
१२ मे रोजी दुपारी १२ वाजता दोन्ही देशांचे DGMO पुढील रणनीतीवर चर्चा करणार.
अमेरिकेच्या मध्यस्थीची महत्त्वाची भूमिका
युद्धबंदीच्या निर्णयामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी निर्णायक ठरली. ट्रम्प यांनी ट्विटद्वारे दोन्ही देशांचे अभिनंदन करत म्हटले की, “भारत आणि पाकिस्तानने तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोघांचाही संयम आणि सहकार्य प्रशंसनीय आहे.”
पाकिस्तान नरमल्यानंतर भारताची अधिकृत घोषणा
पाकिस्तानकडून 3.35 वाजता झालेल्या अधिकृत फोननंतरच भारताने युद्धबंदीची घोषणा केली. पाकिस्तानच्या नरम भूमिकेनंतरच भारताने पुढाकार घेत शांततेचा मार्ग स्वीकारला, अशी चर्चा आहे.
