सांगोला / प्रतिनिधी: सांगोला शहरातील एस.टी. स्टँडलगत असलेले डॉक्टर गावडे हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रुग्णांची फसवणूक, अवाजवी बिलिंग आणि गैरवर्तनाबाबत याआधीही अनेक तक्रारी समोर आल्या असताना, आता अपघातग्रस्त रुग्ण उपचारासाठी आणण्याच्या कारणावरून रुग्णालयात जोरदार भांडण झाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या एकूणच कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. गावडे यांच्या रुग्णालयात वरीष्ठ व संघटनेच्या आदेशांची पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर तातडीच्या उपचारांऐवजी, रुग्णांना अडवणे, उपचारासाठी अनावश्यक अटी घालणे, तसेच कर्मचाऱ्यांशी व नातेवाइकांशी वाद घालण्याचे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या प्रकारांमुळे सांगोला शहरासह तालुक्यातील अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीती व संतापाची भावना वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय आणि फसवणूक होत असल्याच्या आरोपांची मालिका समोर येत असून, काही नातेवाईकांकडून तर “हे रुग्णालय त्वरित बंद करण्यात यावे” अशी थेट मागणी केली जात आहे. आरोग्य सेवेसारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात अशा प्रकारची मनमानी कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या तक्रारीवर पोलीस प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार? चौकशी होणार का? दोषींवर गुन्हा दाखल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकप्रतिनिधी मात्र गप्प का ?
सांगोला शहरात रुग्णालयासंदर्भात इतके गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर येत असताना, लोकप्रतिनिधींचे मौन म्हणजे अनेक प्रश्न उपस्थित करणारी घटना ठरत आहे. नगरपालिका निवडणुकांच्या गडबडीत या संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष तर झाले नाही का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. निवडणूक संपल्यानंतर तरी लोकप्रतिनिधी या प्रकरणाची दखल घेणार का? दोषींवर कारवाईसाठी पुढाकार घेणार का? की सर्व काही ‘जैसे थे’ सुरू राहणार? असा सवाल जनतेने केला आहे.
InPublicNews या प्रकरणाचा पाठपुरावा होत असून, आणखी कोणते धक्कादायक वास्तव समोर येणार का, तसेच याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाग 4 : डॉ.गावडे हॉस्पिटलवर गंभीर आरोपांचा आणखी भडकाsss! रुग्ण आणि नातेवाईकांसह प्रशासनाची फसवणूक ?
