सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर भीषण अपघात; एक मृत्यू, एक जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोहाळे गावच्या हद्दीत घडला

सोलापूर/श्रीराम देवकते : सोलापूर ते मंगळवेढा महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला मागून कारने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सांगोला शहरातील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण जखमी आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोहाळे गावच्या हद्दीत घडला असून, सत्याप्पा बसाप्पा डुम (वय 54, रा. दत्तनगर, वासूद रोड, सांगोला) आणि कुमार शंकर माळी (रा. माळवाडी, सांगोला) हे सोलापूरला गेले होते.
रात्री ११च्या सुमारास सोलापूरहून सांगोल्याकडे परतताना, सोहाळे गावाजवळ कारचालकाचा ताबा सुटल्याने कारने समोर चाललेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर जाऊन जोरदार आदळली. यावेळी सत्याप्पा डुम आणि कारचालक कुमार माळी गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी दोघांना तातडीने सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान उपचार सुरू असताना सत्याप्पा डुम यांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी माहिती दिली.
दरम्यान, पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनूसार, या अपघातानंतर मृत सत्याप्पा डुम यांचा मुलगा बसवराज डुम याने कारचालक कुमार माळी विरोधात कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर ठरली असून, महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत चालल्याने नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.