
सांगोला : अचकदाणी-महूद रोडवर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा सोलापुरातील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात महिलेच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची फिर्याद पतीने दिली असून, पोलिसांनी त्यांच्या मुलाविरोधात भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा नोंदवला आहे.
अपघाताची घटना कशी घडली?
अपघातस्थळी मिळालेल्या माहितीनुसार, घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दुचाकीवरून जात असताना समोर अचानक काहीतरी आडवं आल्याने मुलाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे दुचाकी (क्र. एमएच ४५/वाय ४०२०) समोरून जोरात आदळली आणि मागे बसलेल्या वृद्ध महिला रस्त्यावर पडल्या. डोक्याला जबर मार लागल्याने त्या बेशुद्ध झाल्या.
अपघातानंतर पतीने तात्काळ खासगी वाहनाने पत्नीला पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सांगोला पोलिसांनी अपघातग्रस्त महिलेच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.