रेशीम शेतीतून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल : उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर
पीक कॅश क्रॉप असल्याने यातून शेतकऱ्याच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल

सोलापूर/राहुल कोळेकर : जिल्ह्यात रेशीम शेतीला पूरक हवामान आहे. तसेच हिरज येथे रेशीम बाजारपेठ निर्माण झालेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करून रेशीम शेती करण्यासाठी रेशीम विभाग व सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे पीक कॅश क्रॉप असल्याने यातून शेतकऱ्याच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी केले.
नियोजन भवन, सोलापूर येथे ‘एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प’ (ITDP) अंतर्गत रेशीम शेती मूल्यसाखळी विकास चर्चासत्र आयोजित करण्यात आले. मा. उप-जिल्हाधिकारी (महसूल) तथा जिल्हा पर्यटन अधिकारी श्री. अमृत नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम उद्योजक, तज्ज्ञ आणि अधिकारी यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती प्रितम कुंटला, रेशीम विकास अधिकारी विनीत पवार, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. एस. एच. पवार, कृषी विकास तज्ञ (ITDP_PMC प्रायमूव्ह) जितेंद्र नाईक व शिरीष तेरखेडकर, प्रमुख समन्वयक भरत काळे, उपजीविका तज्ञ प्रविण कु-हे, स्थापत्य अभियंता विनायक जवळकोटे, क्षेत्र समन्वयक राहुल डफळ यांची उपस्थिती होती.
अमेरिकेच्या “या” महिला अधिकाऱ्यावर चीन का झाले फिदा?
यावेळी उप-जिल्हाधिकारी (महसूल) तथा जिल्हा पर्यटन अधिकारी श्री. अमृत नाटेकर यांनी एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाचा जिल्ह्यातील संभाव्य विकासावर दृष्टीक्षेप टाकून पर्यटन व कृषी व्यवसाय यांचे सुसंवाद साधण्याचे महत्त्व स्पष्ट केले. जिल्ह्यात रेशीम शेतीला पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रेशीम शेती करण्यासाठी रेशीम विभाग व कृषी विभागाने प्रयत्न करावेत असेही त्यांनी सुचित केले.
सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती प्रितम कुंटला यांनी एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाची उद्दिष्टे व धोरणे याबाबत सखोल माहिती दिली. रेशीम विकास अधिकारी श्री. पवार यांनी तुती लागवड, कोष निर्मिती आणि शासकीय योजनांच्या मदतीने रेशीम उद्योग विस्तार याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. एस. एच. पवार (सिंहगड इन्स्टिट्यूट) यांनी रेशीम उद्योगातील मूल्यसाखळी आणि अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर भर दिला. श्री. जितेंद्र नाईक (कृषी विकास तज्ञ, ITDP_PMC प्रायमूव्ह) यांनी रेशीम उत्पादक कंपन्यांचे महत्त्व व उद्योगातील नव्या व्यावसायिक संधींवर प्रकाश टाकला. श्री. शिरीष तेरखेडकर यांनी उपस्थित उद्योजकांच्या प्रश्नांना उत्तर देत, उद्योगवाढीसाठी उपयुक्त धोरणे आणि उपाययोजना याबद्दल चर्चा केली.
या चर्चासत्रात उपस्थित तज्ज्ञांनी रेशीम उद्योगाच्या वाढीसाठी सहकार्य आणि नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले. तसेच, जिल्ह्यातील रेशीम शेतीला गती देण्यासाठी नवीन व्यावसायिक संधी, सरकारी योजना व तांत्रिक प्रशिक्षणाच्या गरजेवर भर देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख समन्वयक श्री. भरत काळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर श्री. शिरीष तेरखेडकर (कृषी विकास तज्ञ) यांनी बैठकीच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा समारोप समन्वयक श्री. भरत काळे यांनी उपस्थितांचे आभार मानून केली. हे चर्चासत्र जिल्ह्यातील रेशीम उद्योगवाढीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी मोहोळ, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील 30 प्रगतशील रेशीम उद्योजक या चर्चासत्रात सहभागी झाले होते.