एसटी बसच्या अपघातानंतर चालकास दमदाटी; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगोला / प्रतिनिधी: एसटी बसच्या अपघातानंतर चालकाला दमदाटी व शिवीगाळ करत बस पुढे जाण्यापासून रोखल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सरकारी कामात अडथळा निर्माण करून कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास सांगोला-मिरज राष्ट्रीय महामार्गावरील जुनोनी गावाजवळील आत्तार कॉलनीसमोर घडली. धाराशिव आगाराची धाराशिव-पणजी ही एसटी बस सांगोल्यातून पणजीकडे जात असताना, एका दुचाकीस्वाराने अचानक बसला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला.
बस चालकाने सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अपघातानंतर त्यांनी तत्काळ गाडी थांबवून जखमीला मदत केली आणि अॅम्बुलन्स बोलावून त्याला रुग्णालयात पाठवले.
अपघातानंतर दुचाकीस्वाराचे नातेवाईक घटनास्थळी आले आणि त्यांनी बस चालकास शिवीगाळ, दमदाटी तसेच धक्काबुक्की करत बसची चावी काढून घेतली. “मोटारसायकलचे नुकसान व उपचार खर्च भरल्याशिवाय बस पुढे जाऊ देणार नाही,” असा पवित्रा घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात दोघांविरुद्ध कलम 353 (सरकारी कामात अडथळा), 504 (शब्दांनी दमबाजी), 506 (धमकी) व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.