डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर आणि सारथी युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार वसाहतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने करण्यात आली.
यानंतर सारथी युथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी डॉ. आंबेडकर यांचा जीवनप्रवास व कार्य याविषयी माहिती दिली.
जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये तीन तास अखंड अभ्यास, स्वाक्षरी मोहीम आणि स्वच्छता अभियान अशा उपक्रमांचा समावेश होता.
एमआयडीसी विनायक नगर येथील कामगार कुटुंबातील युवक-युवतींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजित कुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार आणि सारथी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अँड. जावेद नगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
समन्वयक गुरुनाथ ताटे आणि स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले. सूत्रसंचालन स्नेहा यरगुंटला यांनी तर आभारप्रदर्शन कांचन सुरवसे यांनी केले. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली