Dr Ganpatrao Deshmukh College
रोहित हेगडे : सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासात स्वर्गीय गणपतराव देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि दीपक आबा यांचे नाव आदराने घेतले जाते. या नेत्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय आयुष्यात सांगोला शहर व तालुक्यात संयम, शांतता आणि सुसंस्कृत राजकारणाचा पायंडा पाडला. मतभेद असले तरी वैचारिक मर्यादा, शिस्त आणि प्रोटोकॉल यांचे पालन हेच त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते.
थेट सवाल जनतेतून : अत्यंत खालच्या पातळीवरील घटना…
मात्र सध्या तालुक्यात नेमके काय चालले आहे, असा थेट सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. स्व. आबासाहेबांच्या नावाने चालणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये प्रोटोकॉलचे उल्लंघन, शिक्षकांना नाहक त्रास, नियमबाह्य नियुक्त्या, एसआयटी चौकशी, विद्यार्थ्यांना बेल्टने मारहाण, वादानंतर काळे फासण्यासारखे प्रकार—अशा अत्यंत खालच्या पातळीवरील घटना घडत असल्याच्या गंभीर चर्चा सुरू आहेत. आबासाहेबांच्या हयातीत अशा गोष्टी कधीही घडल्या नव्हत्या; मात्र त्यांच्या पश्चात संस्थांमध्ये अनुशासन ढासळल्याचे चित्र दिसत असल्याची खंत शिक्षक आणि पालक व्यक्त करत आहेत.
संस्थेच्या बॅनरवर प्रोटोकॉल नाही?
शाळेतील सांस्कृतिक महोत्सवात घडलेली एक घटना अधिकच धक्कादायक ठरली आहे. विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख स्व. आबासाहेबांचे नातूही आहेत—यांचे नाव व छायाचित्र कार्यक्रम पत्रिका आणि संस्थेच्या बॅनरवर प्रोटोकॉलनुसार न वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. आमदारांच्या पदाचा सन्मान राखणे अपेक्षित असताना, संस्थेमध्येच प्रोटोकॉल पाळला जात नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. या प्रकारामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, शिक्षण क्षेत्राला राजकीय कपटीपणाचा बळी दिला जात असल्याची भावना बळावत आहे.

स्व.आबासाहेबांनी परिश्रमाने उभे केले शिक्षण मंदिर :
शिक्षण हे समाजाचे मंदिर आहे. ते मंदिर स्व.आबासाहेबांनी परिश्रमाने उभे केले. मात्र आज त्याच मंदिरात स्वार्थी राजकारण, कपटीपणा आणि अंतर्गत संघर्षांमुळे मूल्यांची पायमल्ली होत असल्याचा आरोप होत आहे. शिक्षण संस्थांचा वापर वैयक्तिक राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी होऊ नये, अशी स्पष्ट मागणी तालुक्यातून होत आहे.
प्रोटोकॉलचे पालन, शिक्षक-विद्यार्थ्यांचा सन्मान, नियमबद्ध कारभार आणि पारदर्शकता—याशिवाय शिक्षण व राजकारण दोन्हीही विश्वासार्ह ठरत नाहीत. अन्यथा “राजकारण” नव्हे, तर “कपटीपणा” अशीच ओळख जनतेत रूढ होण्याची भीत व्यक्त केली जात आहे.


