Blog

Pune Rape Case :  बसचा वाहक असल्याची बतावणी करत आरोपीने केला अत्याचार              

स्वारगेट बस स्थानकात सुरक्षेचा गंभीर प्रश्न!


पुणे/विशेष प्रतिनिधी : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने स्वतःला बसचा वाहक असल्याचे सांगून पीडित तरुणीची फसवणूक केली आणि तिच्यावर अत्याचार केला. या संदर्भात बसच्या चालकाने पोलिसांना जबाब दिला असून, स्वारगेट ते सोलापूर जाणारी ही बस विनावाहक होती, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोपीने बनाव करून तरुणीला जाळ्यात ओढल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप फरार असून, पोलिसांचा शोध सुरू आहे.

स्वारगेट बस स्थानकात सुरक्षेचा गंभीर प्रश्न

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून, स्वारगेट बस स्थानकाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नराधमाने तरुणीवर अत्याचार केला.

या घटनेनंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेने स्वारगेट बस स्थानकात आंदोलन केले. शिवसेना नेते वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी बस स्थानकातील सुरक्षा केबिनच्या काचा फोडल्या.

दरम्यान, स्वारगेट स्थानकात आणखी एक धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. स्थानकात बंद असलेल्या जुन्या बसमध्ये कंडोम्स, फाटलेल्या साड्या, शर्ट आढळले असून, बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे.

घटना नेमकी कशी घडली?

– मंगळवारी पहाटे ३.४० वाजता एसटी बस (एच 06 BW 0319) स्वारगेट आगारात पोहोचली.

– सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आरोपीने पीडित तरुणीला फसवले.

– तो स्वतःला वाहक असल्याचे भासवत, बसमध्ये गेल्या १५ वर्षांपासून ड्रायव्हर असल्याचे सांगितले.

– फलटणला जाणाऱ्या तरुणीला बसमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

 

पोलिस तपास आणि पुढील कारवाई

सध्या स्वारगेट पोलिस आरोपीचा शोध घेत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांकडून बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या घटनेने पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिस आणि प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button