गायीचे शेण बनले इंधन! जपानचा अनोखा प्रयोग
जैविक कचऱ्याचा प्रभावी पुनर्वापर करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना

जपान : जपानने गायीच्या शेणापासून ऊर्जा निर्माण करण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली असून, या अनोख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीमधील जैविक कचऱ्याचा पुनर्वापर करून तो इंधनात बदलता येणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत निर्माण होऊन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल. हा उपक्रम भविष्यातील इंधन संकटावर महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.
शिकाओई शहरातील पथदर्शी उपक्रम
जपानच्या उत्तर भागातील शिकाओई शहरात हा अभिनव प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हे शहर मुख्यतः दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध असून, दरवर्षी येथे सुमारे 20 दशलक्ष टन गायीचे शेण जमा होते. पारंपरिक पद्धतीने वाया जाणा-या या जैविक कचऱ्याचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी करण्याचा निर्णय स्थानिक शास्त्रज्ञांनी घेतला आहे. या प्रक्रियेतून गायीच्या शेणातून हायड्रोजन वायू तयार केला जातो, जो इंधन म्हणून वापरता येतो.
ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया
या प्रक्रियेसाठी स्थानिक शेतकरी त्यांच्या गायींचे शेण आणि मूत्र एका मोठ्या टाकीत गोळा करतात. या टाकीला अॅनारोबिक डायजेस्टर म्हणतात. यात सूक्ष्मजीव असतात, जे जैविक कचऱ्याचे विघटन करून बायोगॅस निर्माण करतात. नंतर या बायोगॅसवर स्टीम रिफॉर्मिंग प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे तो शुद्ध हायड्रोजन वायूमध्ये रूपांतरित होतो. हा हायड्रोजन स्थानिक पातळीवर ट्रॅक्टर, शेतीसाठी लागणारी उपकरणे आणि काही उद्योगांसाठी इंधन पुरवतो.
उन्हाळ्यात घटतंय दूध उत्पादन ? ‘हे’ करा आणि वाढवा
हरित ऊर्जा आणि भविष्यातील शक्यता
शिकाओई शहराने ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जैविक कचऱ्याचा प्रभावी पुनर्वापर करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना दिली जात आहे. हा उपक्रम केवळ कचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा नाही, तर नूतनीकरणयोग्य ऊर्जा निर्मितीसाठी एक आदर्श उदाहरण आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येण्याची शक्यता आहे.
जगभरात विस्तारण्याची गरज
सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर दिसून येतो, मात्र हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांची संख्या तुलनेने कमी आहे. शिकाओई शहरातील या प्रयोगामुळे हायड्रोजन इंधनाच्या वापराला चालना मिळू शकते. विशेष म्हणजे, जपानमधील फुकुओका शहरात माणसांच्या विष्ठेपासून हायड्रोजन तयार करण्याचा उपक्रम राबवला जात आहे, जो कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांसाठी इंधन म्हणून वापरला जातो.