राज्यात शिक्षकांसाठी गणवेशाचा विचार : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

मुंबई | प्रतिनिधी: राज्यातील शिक्षकांना देखील आता गणवेश असावा का, या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. “राज्य पातळीवर एकसमान गणवेश सक्तीने लागू न करता, प्रत्येक शाळेने आपापल्या पातळीवर गणवेश निश्चित करावा,” असे भुसे यांनी स्पष्ट केले.
भुसे मालेगाव येथील कार्यक्रमात बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकांनी एकसारखी साडी नेसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. “शिक्षिकांच्या एकरूप वेशभूषेने मन भारावले. सर्व शिक्षकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “शिक्षकांसाठी वस्त्रसंहिता आधीच आहे. आता गणवेशाची गरज जाणवते. डॉक्टर, वकील यांना त्यांच्या गणवेशामुळे समाजात ओळख मिळते. शिक्षकांनाही तसा सन्मान मिळावा, ही अपेक्षा आहे.”
गणवेशाचा निर्णय शाळांच्या हातातच
राज्य सरकार एखादा ठराविक गणवेश लादणार नसून, शिक्षकांनी आपल्या शाळेत एकत्र येऊन सुसंगत आणि सन्मानपूर्वक गणवेश ठरवावा, असे भुसे यांनी सुचवले. विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांची एकसमानता दिसावी, हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षक सेनेची संमिश्र प्रतिक्रिया
ठाणे जिल्ह्यातील शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्रमोद पाटोले यांनी सांगितले की, “नियमावली असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्येक शिक्षक-शिक्षिकेला ठराविक पोशाख सोयीस्कर वाटेलच असे नाही. त्यामुळे वेशभूषेत थोडे स्वातंत्र्य हवे.”