कडलास/संग्राम गायकवाड : कडलासमध्ये शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. सकाळी शिवश्री सुनील काका केशव गायकवाड यांच्या शुभहस्ते सुपुत्र शंभूराजे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेक मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. या मंगलमय सोहळ्याला गावातील असंख्य शिवशंभु प्रेमींनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती.
या जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून गावात एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि तब्बल ५७ रक्तदात्यांनी आपले रक्त अर्पण केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
याशिवाय, सुपुत्र शंभूराजे यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कडलासच्या कार्यक्षेत्रात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ५० विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम पर्यावरणाबद्दलची बांधिलकी दर्शवणारा ठरला.
कडलासमध्ये शिवपुत्र शंभूराजे जन्मोत्सव सोहळा केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण जागृतीचा संदेश देणारा ठरला. या कार्यक्रमातील नागरिकांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय होता.
