साईबाबांच्या चरणी 68 लाखाचा 788.44 ग्राम सुवर्ण मुकुट अर्पण!

शिर्डी / प्रतिनिधी: साईबाबांच्या चरणी श्रद्धा अर्पण करण्याची परंपरा नवी नाही. मात्र शनिवारी शिर्डीच्या साई मंदिरात झालेलं एक दान देशभरात चर्चेचं कारण बनलं आहे. आंध्रप्रदेशातील गुंटूर येथील एका अनाम साईभक्ताने तब्बल ६८ लाख रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे.
788 ग्रॅम सोनं, डोक्यावर ‘ॐ’ कोरलेला मुकुट
साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुकुटाचं वजन 788.44 ग्रॅम असून त्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या मुकुटावर डायमंडने कोरलेलं ‘ॐ’ चिन्ह हे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
साईबाबांच्या सुवर्ण मुकुटांची संख्या 28 वर
या नव्या मुकुटानंतर, साईबाबांच्या संग्रहात असलेल्या सुवर्ण मुकुटांची एकूण संख्या 28 वर पोहचली आहे. आणि वर्ष 2025 मध्ये मिळालेलं हे सर्वात मौल्यवान दान ठरलं आहे.
नाव-ओळख ठेवली गुप्त, पण श्रद्धा अमूल्य
या भक्ताने आपली नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली आहे. संस्थानकडून त्या भक्ताचा औपचारिक सत्कार करण्यात आला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
साईबाबांच्या खजिन्यात भक्तांची श्रीमंती
देश-विदेशातून कोट्यवधी साईभक्त दररोज विविध स्वरूपात आपली श्रद्धा व्यक्त करत असतात. यामध्ये सोने, चांदी, हिरे, तसेच मोठ्या प्रमाणात रोख रक्कम यांचा समावेश असतो. मागील काही वर्षांपासून साईबाबांच्या सुवर्ण मुकुटांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, प्रत्येक दानात श्रद्धेचा झळाळता सुवर्णस्पर्श जाणवतो.