
मुंबई/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील CET (सामाईक प्रवेश परीक्षा) यात मोठा घोटाळा उघडकीस आला असून, टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येकी २२ लाख रुपये घेण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली असून, मुख्य सुत्रधार हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
स्पॅम कॉलद्वारे विद्यार्थ्यांची फसवणूक
CET कक्षामार्फत MBA, MMS, अभियांत्रिकी आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान, दोन विद्यार्थ्यांनी स्पॅम कॉलद्वारे मार्क वाढवून देण्याच्या प्रलोभनाची तक्रार दिली.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चौकशी समिती नेमली, आणि तपासात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांचे पुरावे हाती लागले. हा घोटाळा राज्यापुरता मर्यादित नसून देशभर पसरलेला रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पेन्शनधारकांनी का भरावा आयटी रिटर्न
२२ लाखांमध्ये मार्क वाढवण्याची ऑफर!
चौकशीत उघड झाले की, एका पेपरमध्ये टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येकी २२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. आरोपींनी अनेक विद्यार्थ्यांना फोन करून “मार्क वाढवून मिळतील” असे आमिष दाखवले. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून कठोर कारवाईचे आश्वासन
या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर CET परीक्षा पारदर्शक करण्यासाठी आणि भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी अधिक दक्षता घेण्याचे आदेश सरकारने CET कक्षाला दिले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आणि कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. CET घोटाळ्याचा पुढील तपास सुरू असून, आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.