दहावी-बारावी निकालांची तारीख जाहीर: बोर्डाकडून मोठी अपडेट!

पुणे/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी माहिती आली आहे. यंदा बारावीचा निकाल १० मेपूर्वी, तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी दहावी-बारावीचे निकाल २० मेनंतर जाहीर झाले होते. मात्र, यंदा परीक्षा वेळेआधी घेण्यात आल्यामुळे निकालही लवकर लागणार आहेत. यंदा परीक्षा १० ते १५ दिवस आधी घेण्यात आल्या, त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीही वेळेत पूर्ण झाली आहे. निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून, निकालाची डेडलाईन यंदा पाळण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
डिजिलॉकरवर मिळणार निकाल
दहावी-बारावीचे निकाल डिजिलॉकर अॅपवर उपलब्ध करून देण्यात येणार असून, २१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे जिथे ८७ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. यातील ६० ते ६५ टक्के आयडी मंडळाकडे उपलब्ध आहेत. हे निकाल कायमस्वरूपी डिजिलॉकरवर राहणार आहेत.
शिक्षकांच्या वेळेत केलेल्या तपासणीमुळे यशस्वी तयारी
मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, यंदा शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार न घातल्यामुळे तपासणीचे काम वेळेत पूर्ण झाले. परीक्षाही सुरळीत पार पडल्या असून, कॉपीच्या घटना तुलनेने कमी झाल्या. गोसावी यांनी विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या आणि प्रशासकीय यंत्रणांच्या सहकार्याचे कौतुक करत निकाल वेळेत जाहीर होणार असल्याची ग्वाही दिली.