
कोल्हापूर : आदमापूरला देवदर्शनास निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. (Kolhapur Car accident) चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. २५) पहाटे निढोरी–कागल मार्गावरील पिंपळगाव बु.गावाच्या हद्दीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Kolhapur Car accident) मृत व्यक्तीचे नाव राजेश शिवाजी शिंदे (रा. वाकी घेरडी, ता. सांगोला) आहे. तर जखमींमध्ये रामचंद्र अशोक शिंदे, मोहन यशवंत शिंदे, अर्जुन भाउसाहेब शिंदे, नवनाथ विलास शिंदे, अक्षय महादेव चन्ने, आण्णासो सुखदेव शिंदे (सर्व रा. वाकी घेरडी) यांचा समावेश आहे.
भाविक बुधवारी पहाटे आदमापूरला देवदर्शनास जात होते. कागलहून निढोरीच्या दिशेने जाताना पिंपळगाव बु.गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने कार (क्र. एम.एच. १२ एन.पी. ९४२४) रस्त्याच्या कडेला झाडावर आदळून पलटी झाली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (Kolhapur Car accident)