
Solapur district Inter-caste marriage
सोलापूर/राहुल कोळेकर : सामाजिक समता व समरसता निर्माण करण्याचे दृष्टीने आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह झालेल्या दांपत्याना 50 हजार रुपये प्रति जोडपे अनुदान वितरीत करण्यात येते. सदर अनुदान विवाहित जोडप्यांचे संयुक्त बँक खात्यावर (पीएफएमएस) PFMS प्रणालीमार्फत डीबीटी द्वारे प्रदान करण्यात येते.
सन 2024-25 या वर्षी शासनाकडून 1 कोटी 61 लाख निधीची तरतूद प्राप्त झालेली आहे. सन 2022-23, सन 2023-24 व सन 2024-25 मधील 276 पात्र लाभार्थ्यांना 1 कोटी 38 लाख इतके अनुदान मंजूर करण्यात आले असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर (पीएफएमएस) PFMS प्रणालीमार्फत डीबीटी द्वारे प्रदान करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हयातील नागरीकांनी तात्काळ जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांचेकडे अर्ज सादर करावेत असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.