सोलापूर / प्रतिनिधी: पोलीस असल्याचा बनाव करत चार अज्ञात दुचाकीस्वारांनी एका महिलेचे तब्बल ३.२० लाखांची सोन्याची दागिने फसवणूक करून लंपास केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील पंढरपूर रोड वर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दाम्पत्य धाराशिव जिल्ह्यात नातेवाइकांच्या लग्नासाठी गेले होते. संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास, आपल्या गावाकडे दुचाकीने परतत असताना दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी त्यांचा पाठलाग करून वाटेत अडवले.
चोरट्यांनी “पुढे पोलिसांची कारवाई सुरू आहे, एवढे दागिने घालून चालणे धोक्याचे आहे” असे सांगून भीती दाखवली. यावेळी घटनास्थळी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीनेही बहुधा त्या टोळीतीलच आपले दागिने काढून देत असल्याचे नाट्य उभे केले. यावर विश्वास ठेवून महिलेने आपल्या गळ्यातील व हातातील चार तोळ्याच्या पाटल्या व एक तोळ्याचा नेकलेस काढून दिला.
त्यानंतर एका चोरट्याने ते दागिने कागदात गुंडाळून पुडी बनवली आणि ती पुन्हा महिलेचा हाती दिली. मात्र काही वेळाने ती पुडी उघडली असता त्यात दागिने नव्हते आणि तोपर्यंत चोरटे घटनास्थळावरून पसार झाले होते.
या घटनेनंतर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार तपास करीत आहेत. पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की आरोपींनी दूरवरून पाठलाग करून निर्जनस्थळी सापडताच डाव साधला.
यापूर्वीही असा प्रकार घडलेला
मोहोळ हद्दीत या आधीही अशाच प्रकारे एक दाम्पत्य फसवले गेले होते. चहाच्या टपरीवर थांबलेल्या पती-पत्नीकडील लाखो रुपयांचे दागिने चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी लंपास केले होते. त्या गुन्ह्यातील आरोपी अद्यापही फरार आहेत. या पुढील तपास पोलिस करत आहेत.
