पेन्शन धारकांना मोठी बातमी, PPO वेळीच जारी होणे गरजेचे; अन्यथा असे होणार मोठे नुकसान!
हे प्रमाणपत्र निवृत्तीच्या किमान आठ महिने आधी मिळणे आवश्यक आहे

विशेष प्रतिनिधी : सरकारी नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती हा एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्यासाठी योग्य नियोजन अत्यावश्यक आहे. जर तुमची निवृत्ती अवघ्या एका वर्षावर आली असेल, तर तुम्हाला पेन्शन आणि ग्रॅच्युइटीसारख्या आर्थिक लाभांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.
अनेकदा निवृत्तीनंतर लाभ मिळण्यास अनावश्यक विलंब होतो, ज्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी सरकारी कर्मचारी असतानाच निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युइटी प्रक्रियेशी संबंधित आवश्यक बाबींची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग या संपूर्ण प्रक्रियेचे नियमन करतो. त्यांनी वेळोवेळी पेन्शन आणि ग्रॅच्युइटी व्यवस्थापनासंदर्भात विविध मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत, ज्यांचे पालन करणे लाभदायक ठरेल.
सरकारी निवासस्थानात राहत असाल तर:
जर तुम्ही सरकारी निवासस्थानात राहत असाल, तर निवृत्तीच्या एक वर्ष आधीच संबंधित विभागाला या निवासस्थानासंबंधी संपूर्ण माहिती द्यावी लागते. इस्टेट डायरेक्टोरेट विभागाद्वारे “नो डिमांड सर्टिफिकेट” (NDC) जारी केले जाते, जे सरकारी निवासस्थानाशी संबंधित कोणतीही थकबाकी नाही याची पुष्टी करते. हे प्रमाणपत्र निवृत्तीच्या किमान आठ महिने आधी मिळणे आवश्यक आहे, अन्यथा निवृत्तीनंतर सरकारी निवास सोडताना अडचणी निर्माण होऊ शकतात.
सेवा अभिलेखांची पडताळणी:
त्याचप्रमाणे, सेवा अभिलेखांची पडताळणी आणि सुधारणा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सरकारी नियमानुसार (नियम ५६ आणि ५७), निवृत्तीच्या एक वर्ष आधी कर्मचाऱ्याच्या संपूर्ण सेवा नोंदींचा आढावा घेतला जातो. यात काही विसंगती आढळल्यास, त्या निवृत्तीपूर्वीच दुरुस्त करून घेतल्या पाहिजेत, अन्यथा पेन्शन मिळवताना अनावश्यक विलंब होऊ शकतो.
पेन्शनधारकांनी का भरावा आयटी रिटर्न
पेन्शन प्रकरणाचे सादरीकरण:
नियम ५९ आणि ६० नुसार, विभाग प्रमुखाने पेन्शन प्रकरणाचा पूर्ण तपशील वेतन आणि लेखा कार्यालयाकडे पाठवणे आवश्यक आहे. निवृत्त कर्मचाऱ्याने पेन्शनसाठी अर्ज केल्यावर दोन महिन्यांच्या आत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे.
पेन्शन पेमेंट ऑर्डर वेळीच जारी करणे:
पेन्शन वितरण प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी (PPO) जारी करणे अत्यावश्यक आहे. एकदा पेन्शन प्रकरण लेखाधिकारीकडे गेल्यानंतर, ते आवश्यक तपासण्या करून पेन्शन पेमेंट ऑर्डर तयार करतात. मिळालेल्या आदेशानंतर CPA विभाग वीस ते एकवीस दिवसांच्या आत ही ऑर्डर जारी करतो आणि ती पेन्शन वितरण प्राधिकरणाकडे पाठवली जाते.