पुणे/सहदेव खांडेकर : गुढीपाडव्याच्या आगमनाने महाराष्ट्रात आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, यंदा प्रतिकूल हवामानामुळे आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, पुण्यात हापूस आंब्याच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हापूस आंब्याचा दर प्रति डझन ₹५०० ते ₹७०० होता, तर यंदा तो ₹८०० ते ₹१,५०० दरम्यान पोहोचला आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील व्यापारी युवराज काचची आणि अरविंद मोरे यांच्या मते, कोकणातील थंडीचा नियमित कालावधी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अनुभवायला मिळाला नाही. याचा थेट परिणाम आंब्याच्या फुलांवर झाला आणि त्यामुळे उत्पादन घटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनानंतर पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर, ‘काय’ देणार जिल्ह्याला?
मार्च महिन्यात साधारणतः कोकणातून पुणे बाजारात दररोज ४,००० ते ५,००० पेट्या आंब्यांच्या येतात. मात्र, यंदा हा आकडा केवळ १,००० ते २,००० पेट्यांवर घसरला आहे. परिणामी बाजारात मोठी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या कच्च्या हापूस आंब्याच्या एका पेटीला (४ ते ८ डझन) गुणवत्तेनुसार ₹२,५०० ते ₹६,००० दर मिळत आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, १० एप्रिल ते १० मे दरम्यान आंब्याचा मुख्य हंगाम राहणार आहे, त्यामुळे काही प्रमाणात दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा कमी उत्पादनामुळे हापूस आंब्याचा हंगाम लवकर संपुष्टात येण्याची शक्यता असून, त्यामुळे पुढील आठवड्यांत आंब्याच्या दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते.
