सिव्हिल रुग्णालयातून तीन दिवसांच्या बाळाची चोरी; अज्ञात महिला सीसीटीव्हीत कैद

मिरज / प्रतिनिधी: मिरज येथील शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांच्या बाळाची अज्ञात महिलेने चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महिला काही दिवसांपूर्वी मिरज सिव्हिल रुग्णालयात प्रसूती झाली होती. त्यांना एक पुत्र झाला होता. आज सकाळी सुमारे ११ वाजता महिला बाळासह झोपल्या असताना एक अनोळखी महिला त्यांच्या रुग्णकक्षात आली. तिने “बाळाला औषधाचा डोस द्यायचा आहे” असे सांगून बाळ त्यांच्या कडून घेतले आणि रुग्णालयातून बाहेर पडली.
तासाभरानंतरही ती महिला परत न आल्याने महिलेचा कुटुंबाने बाळाचा शोध घेतला. यानंतर रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली असता, संबंधित आरोपी महिला बाळाला घेऊन रुग्णालयाबाहेर जाताना दिसून आली. विशेष म्हणजे ही आरोपी महिला गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालय परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याचेही सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसून आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बाळाच्या अपहरणानंतर संतप्त झालेल्या महिलेचा कुटुंबीयांनी रुग्णालय, प्रशासनावर तीव्र संताप वक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून बाळ पळवून नेलेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.