अनकढाळ टोल नाक्यावर भाविकांवर हल्ला; व्यवस्थापकासह आठ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

सांगोला / प्रतिनिधी : अनकढाळ टोल नाक्यावर फास्टटॅग स्कॅन न झाल्याच्या कारणावरून हैद्राबादहून देवदर्शनावरून परतणाऱ्या कुटुंबीयांवर टोल कर्मचाऱ्यांनी रबरी पाइप, वायर आणि काठ्यांनी हल्ला केला. या प्रकरणी मॅनेजरसह आठ जणांविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार , रात्री ९.३० ते १० च्या सुमारास घडली. कार मालक (रा. हैद्राबाद) हे आपल्या पत्नी, दोन मुलं व चालकासह गाडीने कोल्हापूरहून पंढरपूरकडे जात असताना टोल नाक्यावर त्यांचे फास्टटॅग स्कॅन झाले नाही. कार मालकाने स्कॅन करून पाहण्याची विनंती केली असता कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केली. यानंतर वाद वाढत गेला आणि आठ कर्मचाऱ्यांनी मिळून कार मालका वर कुटुंबीयांवर हल्ला केला.
कार मालक , त्यांची पत्नी आणि दोन मुलांना रबरी पाइप, वायर व काठ्यांनी जबर मारहाण करून जखमी करण्यात आले. वाहनाच्या काचा आणि मोबाईल फोडण्यात आले. या घटनेमुळे कुटुंबीयांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. फिर्यादीनुसार, टोल मॅनेजर व अज्ञात तीन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांन कडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.