
सांगोला/रोहित हेगडे : सांगोला महाविद्यालयात सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्या काव्यमय समाजप्रबोधनाचा कार्यक्रम मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी पार पडला. महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. १७ आणि १८ फेब्रुवारी दोन दिवस हा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला.
शब्दांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा मार्ग स्वीकारला :
शब्दांमधून परिवर्तन घडवणारे, तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि समाजप्रबोधनाचा मंत्र जपणारे सुप्रसिद्ध कवी अनंत विठ्ठल राऊत यांचे साहित्यविश्व मराठी मनावर राज्य करत आहे.
कवी, लेखक, वक्ता अशा विविध भूमिका निभावणारे अनंत राऊत हे मुळचे अकोला जिल्ह्यातील व्याळा गावचे. अभियांत्रिकीच्या (M.Tech) क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेल्या या प्रतिभावंताने उत्तम पगाराची नोकरी सोडून शब्दांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा मार्ग स्वीकारला.
‘मित्र वणव्यामध्ये‘ची जादू
अनंत राऊत यांच्या ‘मित्र वणव्यामध्ये’ या कवितेने तरुणाईच्या मनावर छाप सोडली आहे. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘भोंगा वाजलाय’, ‘मायबाप’, ‘तुझ्या गावावरून’ यांसारख्या कवितांनी समाजाला एक नवा विचार दिला. विशेषतः ‘मायबाप’ कवितेच्या प्रभावामुळे अनेक वृद्धाश्रमांतील पालकांना त्यांच्या मुलांनी घरी नेले, हा या कवितेच्या प्रभावाचा जिवंत पुरावा ठरतो.
संघर्षातून घडलेले साहित्यिक व्यक्तिमत्त्व
अनंत राऊत यांचा जन्म अत्यंत साध्या कुटुंबात झाला. वडील पोस्टमन, तर आई दुसऱ्याच्या शेतात राबणारी; पण मुलांना शिकवण्याचा ध्यास घेणारी. हा संघर्षच त्यांच्या जडणघडणीचा पाया ठरला. “परिस्थितीला दोष न देता, संघर्षाचा आनंद घेत पुढे जायचं,” ही त्यांची शिकवण आजच्या तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
लोकप्रियतेच्या शिखरावरही मातीशी नाळ जुळलेली
कवी अनंत राऊत यांनी आपल्या काव्यलेखनाच्या प्रवासात अनेक पुरस्कार मिळवले, साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले, तरीही त्यांनी मातीशी असलेली नाळ कधीही तोडली नाही. त्यांच्या कवितांमधून समाजातील वास्तव मांडण्याची त्यांची हातोटी रसिकांना मंत्रमुग्ध करते.
“कविता ही वेदनेला फुंकर घालते…”
त्यांची प्रसिद्ध कविता ‘दुःख अडवायला उंबऱ्यासारखा’, जी एका जिवलग मित्राच्या स्मरणार्थ लिहिली, ती हृदयस्पर्शी आहे. त्यांच्या कवितेतून केवळ मनोरंजन नाही, तर भावना, वेदना आणि समाजपरिवर्तनाचं बळ आहे.
अनंत राऊत यांनी शब्दांच्या शक्तीचा उपयोग समाजाच्या जागृतीसाठी केला असून, त्यांची कविता ही परिवर्तनाची नांदी ठरते.
सांगोल्यात कवितांची मेजवानी! सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे होणार काव्यमय समाजप्रबोधन!
कवी अनंत राऊत यांच्या सामाजिक जागृती करणाऱ्या कविता महाराष्ट्रभर गाजलेल्या आहेत. त्यांच्या काव्यमय शैलीतून समाजप्रबोधनाचे प्रभावी त्यांनी केले. त्यांच्या काव्यातून त्यांनी सांगोल्यातील शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींना त्यांनी मंत्रमुग्ध केले.
समाजाला जागरूक करण्याचे सामर्थ्य असलेल्या काव्यशैलीतून सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज शब्दाचा अर्थ सांगत, मोबाईल वापरू नका,कोणावर प्रेम केले पाहिजे, आपले माय-बाप जगात प्रथम, असे विविध विषयावर समाजप्रबोधन केले. त्यांच्या समाजातील विविध विषयांवरील प्रखर कवितांनी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली.
पुढे त्यांनी आपल्या काव्यातून समाजातील अन्याय, विषमता, शिक्षणाचे महत्त्व आणि युवकांची जबाबदारी यासारख्या विविध विषयांवर प्रकाश टाकला. त्यांची प्रभावी शैली, तिखट शब्दप्रयोग आणि मार्मिक भाष्याने उपस्थितांमध्ये ऊर्जा संचारली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. साहित्य आणि काव्यप्रेमींसाठी ही पर्वणी ठरली. त्यांच्या कवितांनी उपस्थितांना प्रेरित करत सामाजिक जाणीव दृढ करण्याचा संदेश दिला.