सांगोला | प्रतिनिधी :
सांगोला तालुक्यातील अजनाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. येथील कारभारात अनियमितता व कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत सहाय्यक निबंधकांनी सहा संचालकांना अपात्र ठरवून पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या धडक कारवाईमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
चौकशीत ठपका; खुलासा ठरला तोकडा
संस्थेच्या कामकाजाबाबत करण्यात आलेल्या चौकशीत एकूण चार महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. या मुद्द्यांवर संबंधित संचालकांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसून मोघम स्वरूपाचा असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
तसेच संस्थेचे कामकाज महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, नियम १९६१ तसेच संस्थेच्या पोटनियमावलीनुसार न झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पदच्युत करण्यात आलेले संचालक
सहाय्यक निबंधक डॉ. वैशाली साळवे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७८-अ (ब) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत खालील ६ सदस्यांना समिती सदस्य पदावरून काढून टाकले आहे :
- श्री. हनुमंत विठ्ठल येलपले
- श्री. अशोक लक्ष्मण कोळवले
- श्री. हनुमंत धर्मराज कोळवले
- श्री. नारायण पांडुरंग गुरव
- सौ. राणी भारत येलपले
- सौ. उषा बाळू कोळवले
१५ जानेवारी रोजी आदेश जारी
हा आदेश १५ जानेवारी २०२६ रोजी अधिकृतपणे पारित करण्यात आला आहे. चौकशी अहवालातील मुद्द्यांचे समाधानकारक निराकरण करण्यात अपयश आल्याने संबंधित संचालक संचालक म्हणून राहण्यास अपात्र ठरल्याचे आदेशात नमूद आहे.
या निर्णयानंतर अजनाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पुढील कारभाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
