पुणे/सहदेव खांडेकर : (Swargate Rape Case ) स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचारात कुणाचीही गय केली जाणार नाही. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची ‘मिनिट टू मिनिट’ चौकशी करावी,असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
दोषींवर कठोर कारवाईचा इशारा : अजित पवार
अजित पवार यांनी नांदेड येथे बोलताना सांगितले की, “ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून मी या प्रकरणाची ‘मिनिट टू मिनिट’ चौकशी करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.”
ते पुढे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत आरोपीला सुटता कामा नये आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.
जलदगती न्यायालयात खटला, नराधमाला फाशी : एकनाथ शिंदे
याच प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाईल आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आमचे सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेतली जाणार नाही.
शिंदे यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, यापुढे कोणीही आमच्या लाडक्या बहिणींवर अत्याचार करण्याची हिंमत करता कामा नये, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
राज्यभर संतापाची लाट, सरकारवर दबाव ?
स्वारगेट अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारवर दबाव वाढला आहे. आता सरकार आणि पोलीस यंत्रणा या प्रकरणात किती जलद आणि कठोर कारवाई करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.