सांगोला तालुक्यात भीषण अपघात: मालट्रकने दोन मोटारींना ठोकरले; तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, १० जण जखमी

सांगोला / प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील महूद गावाजवळ रात्री उशिरा दोन मोटारींना आयशर मालमोटारीने पाठीमागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर दोन्ही कारमधील दहा जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकी शिवणे येथे पाहुण्यांच्या घरी आयोजित डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आटोपून सर्वजण परत येत असताना हा अपघात घडला. महूद गावाजवळील एका घराजवळ काही वेळ विश्रांतीसाठी दोन्ही मोटारी रस्त्याच्या कडेला थांबल्या असताना, मागून भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने एका मोटारीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ती कार समोरील दुसऱ्या कारवर आदळली.
या अपघातात सर्व जखमींवर पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणी जखमींचा नातेवायाकांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, मालमोटार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सुदैवाने, डोहाळे जेवणाचा कार्यक्रम जिचा होता, ती या अपघातात सुखरूप बचावली.