Fake video case : आराध्या बच्चनने दाखल केली याचिका, कोर्टकडून थेट गूगलला नोटिस
पाहा काय आहे नक्की आराध्याचे प्रकरण...

इन पुब्लिक न्यूज/हेमा हिरासकर : प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आराध्याने विनंती केली आहे की, तिच्या आरोग्याविषयी विविध वेबसाइट्सवर पसरवण्यात येणारी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती त्वरित हटवली जावी. यावर आता न्यायालयाने नोटीस जारी केली आहे.
कोर्टाने गूगलला पाठवली नोटीस
आराध्या बच्चनने तिच्या याचिकेत या प्रकरणावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या संदर्भात सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली आणि त्यानंतर गूगलसह इतर संबंधित वेबसाइट्सना नोटीस बजावण्यात आली. या नोटिसमध्ये असे नमूद केले आहे की, चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या संबंधित व्यक्तींनी अद्याप न्यायालयात उपस्थिती दर्शवलेली नाही. त्यामुळे त्यांचा बचावाचा अधिकार संपुष्टात आलेला आहे.
फेक बातम्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी
आराध्या बच्चनच्या आरोग्यासंबंधी फेक बातम्या आणि अफवा सोशल मीडियावर वारंवार पसरवल्या जात असल्याने ती आणि तिचे कुटुंब चिंतेत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी १७ मार्च २०२५ रोजी होणार आहे.
फेक न्यूजवर नियंत्रण आवश्यक
सध्या सोशल मीडियावर आणि काही वेबसाइट्सवर खोटी माहिती मोठ्या प्रमाणावर पसरवली जाते. त्यामुळे सेलिब्रिटींना अनेकदा विनाकारण त्रास सहन करावा लागतो. आराध्या बच्चनच्या या याचिकेमुळे फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नियंत्रण आणण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.