सांगोला शहर,तालुका बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
महाराष्ट्रातला सर्वात मोठा जनावरांचा बाजार या बंदमुळे ठप्प

सांगोला/अविनाश बनसोडे : रविवार दि ९ मार्च रोजी सांगोला शहर व तालुक्यात बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शहरातील दुकाने, बाजारपेठा आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत.
इन पब्लिक न्यूजशी बोलताना अरविंद केदार म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्याच्या निषेधार्थ आरोपींना लवकरात लवकर फाशी होण्यासाठी दि. ९ मार्च रोजी संपूर्ण शहर व तालुका बंद ठेवण्यात आला आहे. व्यापारी बंधू आणि भगिनींनी यास मोठ्या प्रमाणात सहकार्य केले असून हा मूक मोर्चा आणि बंद शांततेच्या मार्गाने होत आहे. या बंदला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू नये यासाठी लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन व विविध प्रतिष्ठान यांच्याकडून शहरात सर्व ठिकाणी बंदोबस्त करण्यात आला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, सांगोला तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी हा बंद पुकारण्यात आला. या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी महाराष्ट्रातला सर्वात मोठा जनावरांचा बाजार भरतो आणि या बंदमुळे हा बाजार सुद्धा आज ठप्प झाला आहे. हा बंद दिवसभर आहे, असे इन पब्लिक न्यूजशी बोलताना अरविंद केदार यांनी सांगितले.
शांततेत पार पडेल मूक मोर्चा :
बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. नागरिकांनी स्वयंप्रेरणेने बंदला पाठिंबा दिला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी शहरात तालुक्यात गस्त तसेच चोख बंदोबस्त ठेवला आहे.