हिंदू धर्मातील सण-उत्सवांची परंपरा ही केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नसून तिच्यामागे निसर्ग, ऋतूचक्र, सामाजिक जीवन आणि मानवी आरोग्य यांचा बारकाईने विचार केलेला दिसून येतो. वर्षभर साजरे होणारे विविध सण विशिष्ट ऋतूंशी जोडलेले आहेत. त्यामध्ये श्रावण मासाला विशेष महत्त्व आहे. हा महिना निसर्गातील बदल, शेतीतील चैतन्य आणि सामाजिक-सांस्कृतिक जीवनातील उत्साह यांचा अनोखा संगम घडवून आणतो.
श्रावण सुरू होईपर्यंत पावसाळ्याला साधारण दीड महिना झालेला असतो. उन्हाळ्याच्या तीव्रतेनंतर धरती हिरवाईने नटलेली असते. शेतांमध्ये पेरणी पूर्ण झालेली असते आणि पिके डोलू लागलेली असतात. पाऊस समाधानकारक झाल्यास शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. शेतीची प्राथमिक कामे पूर्ण झाल्याने त्याला काहीसा मोकळा वेळ मिळतो आणि याच काळात श्रावण मास सुरू होतो.
श्रावणाला हिंदीमध्ये ‘सावन’ तर संस्कृतमध्ये ‘नभस’ असेही संबोधले जाते. या महिन्यातील वातावरणात सतत बदल जाणवतो. कधी रिमझिम पाऊस, तर काही क्षणांत ऊन; सर्वत्र हिरवळ, ओढे-नाले आणि जलस्रोतांमध्ये वाढलेले पाणी, फुललेली वनस्पती आणि पक्ष्यांचा किलबिलाट असे निसर्गाचे मनोहारी रूप श्रावणात पाहायला मिळते. त्यामुळेच श्रावणाला वर्षातील सर्वात प्रसन्न आणि निसर्गरम्य महिन्यांपैकी एक मानले जाते.
श्रावणातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. पावसाळ्यात साप आणि इतर सरपटणारे प्राणी त्यांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सुरक्षित ठिकाणांच्या शोधात बाहेर पडतात. अशा काळात नागांविषयी आदर आणि सहजीवनाची भावना निर्माण व्हावी, निसर्गातील प्रत्येक जीवाचे महत्त्व समजावे, या दृष्टिकोनातून नागपूजेची परंपरा विकसित झाल्याचे मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन करून कुटुंबाच्या सुख-समृद्धी आणि रक्षणासाठी प्रार्थना केली जाते.
नागपंचमीशी अनेक पारंपरिक प्रथा जोडलेल्या आहेत. ग्रामीण भागात या दिवशी चुलीवर तवा ठेवला जात नाही, काही ठिकाणी विशेष पदार्थ तयार केले जातात. महिलांसाठी झोके बांधण्याची परंपराही या काळात मोठ्या उत्साहाने पाळली जाते. पावसाळ्यातील हिरव्यागार वातावरणात झोके घेण्याचा आनंद हा श्रावणाच्या उत्साहाचा अविभाज्य भाग बनला आहे.
श्रावणातील मंगळवार हा नवविवाहित महिलांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. मंगळागौरीचे पूजन करून महिला एकत्र येतात. सवासीनिना हळदी-कुंकू देण्याची परंपरा आहे. रात्री जागरण, पारंपरिक खेळ, गाणी आणि फुगड्या यामुळे मंगळागौरीचा सोहळा आनंदमय होतो. अनेक कुटुंबांमध्ये सलग काही वर्षे मंगळागौर करण्याची परंपरा आजही कायम आहे. या माध्यमातून महिलांमध्ये सामाजिक संवाद, आपुलकी आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन होते.
यानंतर येतो रक्षाबंधनाचा सण. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि भावनिक नात्याचे प्रतीक म्हणून या सणाकडे पाहिले जाते. बहिण कितीही दूर राहत असली तरी राखी बांधण्यासाठी माहेरी येण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आजही जिवंत आहे. राखी बांधून बहिण भावाच्या दीर्घायुष्याची आणि सुखाची कामना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाचे आणि प्रेमाचे वचन देतो. त्यामुळे रक्षाबंधन हा केवळ धार्मिक विधी नसून कौटुंबिक नात्यांना अधिक दृढ करणारा सण आहे.
नारळी पौर्णिमेलाही विशेष महत्त्व आहे. विशेषतः कोळी समाजासाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. समुद्राला नारळ अर्पण करून समुद्रदेवतेची पूजा केली जाते. पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानानंतर समुद्रातील परिस्थिती तुलनेने अनुकूल होण्यास सुरुवात झाल्यानंतर मच्छीमार समुदाय नव्या हंगामासाठी समुद्रात जाण्याची तयारी करतो. त्यामुळे नारळी पौर्णिमा ही श्रद्धा, निसर्ग आणि उपजीविका यांना जोडणारी परंपरा आहे.
श्रावणानंतर कृष्ण जन्माष्टमीचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा हा उत्सव भारतभर विविध पद्धतीने साजरा होतो. मंदिरांमध्ये भजन-कीर्तन, पूजन आणि जन्मोत्सवाचे आयोजन केले जाते. काही ठिकाणी दहीहंडीच्या माध्यमातून उत्सवाला विशेष रंगत येते. श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रेम, मैत्री, कर्तव्य आणि धर्माचा संदेश या उत्सवातून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतो.
श्रावणातील प्रत्येक वारालाही धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिले गेले आहे. श्रावणी सोमवारी भगवान शिवाची पूजा आणि उपवास केला जातो. अनेक भाविक मंदिरात जाऊन अभिषेक करतात. मंगळवारी मंगळागौरीचे पूजन होते. बुधवारी बुधदेवाचे पूजन, गुरुवारी बृहस्पती पूजन, शुक्रवारी जिवतीचे पूजन अशी विविध धार्मिक परंपरा आढळतात.
शुक्रवारी महिलांकडून जिवतीची पूजा करून मुलांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. काही ठिकाणी पुरणाच्या दिव्यांनी मुलांना ओवाळण्याची प्रथा आहे. महिलांच्या घरी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रावणी शनिवारी शनि, मारुती आणि अश्वत्थ वृक्षाचे पूजन करण्याची परंपरा आहे. रविवारी आदित्यराणूबाईचे पूजन केले जाते. श्रावणातील ढग, पाऊस आणि हिरवाईच्या पार्श्वभूमीवर सूर्यप्रकाशाचे बदलते रूपही विशेष जाणवते.
या सर्व परंपरांकडे केवळ धार्मिक कर्मकांड म्हणून पाहण्याऐवजी त्यामागील सामाजिक आणि पर्यावरणीय विचार समजून घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यातील निसर्गातील बदलांशी मानवी जीवनाचे नाते जोडण्याचे काम आपल्या पूर्वजांनी सण-उत्सवांच्या माध्यमातून केले. प्राणी, वनस्पती, जलस्रोत, वृक्ष आणि निसर्गशक्ती यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना या परंपरांमध्ये दिसून येते.
‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे; क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे’, या काव्यपंक्तींमध्ये श्रावणाचे सौंदर्य अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. क्षणाक्षणाला बदलणारे हवामान, हिरवाईने नटलेली धरती आणि सणांच्या निमित्ताने एकत्र येणारी माणसे यामुळे श्रावणाला विशेष भावनिक आणि सांस्कृतिक स्थान प्राप्त झाले आहे.
आजच्या आधुनिक जीवनशैलीत अनेक पारंपरिक प्रथा बदलत असल्या तरी त्यांच्या मुळाशी असलेला निसर्गप्रेम, कुटुंबीयांमधील आपुलकी, सामाजिक एकोपा आणि पर्यावरणाबद्दलची जाणीव जपणे आवश्यक आहे. सण साजरे करताना अंधानुकरण करण्याऐवजी त्यामागील उद्देश समजून घेतला, तर परंपरा अधिक अर्थपूर्ण ठरू शकते.
श्रावण हा त्यामुळे केवळ देवपूजेचा महिना नाही; तो निसर्गाशी संवाद साधण्याचा, कुटुंबीयांना जवळ आणण्याचा, सामाजिक नाती मजबूत करण्याचा आणि आपल्या सांस्कृतिक वारशाची आठवण करून देणारा काळ आहे. श्रद्धा आणि विज्ञान, परंपरा आणि निसर्ग, उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा सुंदर मिलाफ म्हणजे श्रावण. या महिन्यातील प्रत्येक सणाचा आनंद घेताना त्यामागील पर्यावरणीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी परंपरेची जपणूक ठरेल.
