महाराष्ट्राची शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारी मध्ये लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होतात. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषात अवघी पंढरी भक्तिमय होत असताना वारकऱ्यांच्या वाहतुकीची मोठी जबाबदारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीकडून पार पाडली जाते. आषाढी यात्रेच्या काळात एसटीच्या विशेष बससेवेला प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे महामंडळाच्या उत्पन्नातही मोठी भर पडली आहे. त्यामुळे एसटीला खऱ्या अर्थाने ‘पांडुरंग पावला’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून दरवर्षी हजारो अतिरिक्त बसेस सोडल्या जातात. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर यासह विविध जिल्ह्यांतून पंढरपूरसाठी विशेष वाहतूक केली .
विशेष वाहतुकीतून एसटी महामंडळाला तब्बल 5 कोटी 30 लाख मिळाला महामंडळाने जवळपास 5 हजार 500 जादा बसेस सोडल्या होत्या. या विशेष बससेवेचा लाखो वारकऱ्यांनी लाभ घेतला.
आषाढी वारीसाठी एसटीच्या लालपरीला वारकऱ्यांकडून मोठी पसंती मिळाली. यात्रेत जवळपास 9 लाख 24 हजार भाविकांनी एसटी बसमधून प्रवास केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी एसटीकडे वळल्याने महामंडळाच्या महसूल दरात वाढ झाली.
गावापासून थेट पंढरपूरपर्यंत जाण्याची सुविधा, तुलनेने परवडणारे तिकीट, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या विविध प्रवास सवलती तसेच ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले एसटीचे विस्तृत जाळे यामुळे वारकऱ्यांकडून लालपरीला मोठी पसंती मिळत असल्याचे दिसून आले.
आषाढी यात्रेसाठीही एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन विशेष बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले.
आषाढी वारीच्या काळात पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल होत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होतो. त्यामुळे एसटी महामंडळाला केवळ अतिरिक्त बस सोडून चालत नाही, तर बसस्थानक, पार्किंग, प्रवासी नियंत्रण आणि परतीच्या प्रवासाचे नियोजनही करावे लागते.
पंढरपूर परिसरात विविध ठिकाणी तात्पुरती बसस्थानके उभारून वेगवेगळ्या जिल्ह्यांकडे जाणाऱ्या बसेसची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे दर्शनानंतर परतीच्या प्रवासासाठी वारकऱ्यांना शक्य तितक्या सहजपणे बस उपलब्ध होण्यास मदत होते.
एसटीचे चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, यांत्रिक कर्मचारी आणि इतर अधिकारी-कर्मचारी आषाढी यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात तैनात असतात. लाखो भाविकांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी एसटीची संपूर्ण यंत्रणा अनेक दिवस कार्यरत असते.
महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागासाठी आजही एसटी ही सार्वजनिक वाहतुकीचा सर्वात महत्त्वाचा आधार आहे. रेल्वेची सुविधा नसलेल्या गावांमधील वारकऱ्यांसाठी पंढरपूरला जाण्याचा एसटी हा सोयीचा पर्याय ठरतो.
तालुक्याच्या ठिकाणी आणि तेथून थेट पंढरपूरपर्यंत बस उपलब्ध होत असल्याने वारकऱ्यांचा प्रवास तुलनेने सोपा होतो त्यामुळे यंदाची आषाढी वारी अविस्मरणीय ठरली आहे
