मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ल्याची धमकी: पाकिस्तानी नंबरवरून संदेश, मुंबई पोलिस अलर्ट
हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर प्राप्त झाला

मुंबई/सहदेव खांडेकर : मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर प्राप्त झाला आहे. हा संदेश एका पाकिस्तानी क्रमांकावरून पाठवण्यात आला असून, त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर हा संदेश प्राप्त झाला. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने आपले नाव मालिक शहाबाज हुमायून राजा देव असे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या धमकीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, संदेशाचा स्त्रोत आणि त्यामागील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंनाही मिळाली होती धमकी
दरम्यान, याआधीही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा ईमेल आला होता. त्यांच्या शासकीय वाहनावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी बुलढाण्यातील मंगेश वायळ आणि अभय शिंगणे या दोन तरुणांना अटक केली होती.
पोलिसांचा तपास सुरू
मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ल्याच्या धमकीने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय संपर्क तपासले जात आहेत.
पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीच्या उद्देशाबाबत चौकशी सुरू आहे.