In Public News
सांगोला/ विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरातील एका दैनिक वर्तमानपत्रात सांगोला अर्बन बँकेच्या गैरकारभाराविषयी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीचा खुलासा करण्याकरता बँकेचे संचालक मंडळ व बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. मात्र या परिषदेने बँकेवरील संशय अधिकच गडद केला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना बँक प्रशासनाकडून उत्तरे मिळू शकली नाहीत, यामुळे खातेदार व ठेवीदारांमध्ये संभ्रम वाढला आहे.
बँकेचा अहवाल, पण मुख्य प्रश्न अनुत्तरीत!
पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष वेळापुरे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली. बँकेचे उलाढाल, नफा-तोटा, ठेवी आणि कर्ज वाटप यासंदर्भात त्यांचेकडून माहिती देण्यात आली. मात्र, मूळ वृत्ताचा खुलासाच यांनी केला नाही. पत्रकारांनी विचारलेल्या संवेदनशील प्रश्नांना बँकेच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली.
सांगोल्यातील शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकाऱ्याकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?
बँकेच्या उत्तरांपेक्षा प्रश्नच अधिक!
दैनिकात प्रकाशित झालेल्या बातमीवर बँकेने स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही. बँकेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मुद्द्यांवर उत्तर देण्याऐवजी, रिझर्व्ह बँकेच्या नियमांचा हवाला देऊन चर्चा टाळण्यात आली. पत्रकार परिषदेमध्ये बँकेच्या संचालक मंडळाने प्रश्न विचारणाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार संभ्रमात!
बँकेने पत्रकार परिषद घेतली खरी, मात्र प्रेस मिटिंगने विश्वास वाढवण्याऐवजी, संशय वाढवण्याचे काम केले का? खातेदार आणि ठेवीदारांमध्ये आता प्रश्न निर्माण झाला आहे. बँकेने सत्य उघड करण्यापेक्षा प्रश्नांना टाळण्याचे धोरण का अवलंबले? जर दैनिकाने केलेले आरोप चुकीचे असतील, तर बँकेने त्यासंदर्भात ठोस पुरावे का सादर केले नाहीत?
सत्य बाहेर येणार का?
पत्रकार परिषद घेतली खरी परंतु सर्वच प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत असून नेमकं संचालक मंडळाने काय साध्य केलं? सांगोला अर्बन बँकेच्या पारदर्शकतेवर उठलेल्या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरीत आहेत. बँक प्रशासन आता खुलासा करणार का, की ही प्रेस कॉन्फरन्स फक्त गोंधळ घालण्यासाठीच होती? खातेदार आणि ठेवीदार आता बँकेच्या पुढील निर्णयाकडे उत्सुकतेने पाहत आहेत असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
