सांगोल्याचा आवाज थेट दिल्लीत; पशुपालकांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारकडे धडक
शेतकरी–पशुपालकांना मोठे गिफ्ट: सेक्स सॉर्टेड सिमेन व एम्ब्रियो तंत्रज्ञान स्वस्त दरात उपलब्ध करण्याची मागणी
सांगोला : सांगोला तालुक्याचा आवाज पुन्हा एकदा थेट दिल्लीत घुमला आहे. सांगोला येथील उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते व पशुपालक विजयसिंह गजानन सुरवसे यांनी देशभरातील शेतकरी व पशुपालकांना भेडसावणाऱ्या गंभीर अडचणींबाबत थेट केंद्र सरकारकडे निवेदन सादर केले आहे. ग्रामीण भागातील वास्तवाशी जोडलेले प्रश्न मांडणारा एक उद्योजक म्हणून विजय सुरवसे यांनी तळागाळातील पशुपालकांचा आवाज थेट राजधानीपर्यंत पोहोचवला आहे.
हे निवेदन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांना देण्यात आले आहे. यामध्ये पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सेक्स सॉर्टेड सिमेन व एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञान या विषयांवर ठोस मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सांगोला तालुक्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनाही विजयसिंह सुरवसे यांनी पत्र देत या संपूर्ण विषयाची माहिती दिली. यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विजय सुरवसे यांच्या कार्याचे कौतुक करत, पशुपालकांच्या प्रत्येक अडचणीवर जातीने लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले,
“सांगोला तालुका नेहमीच नव्या उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिला आहे. तालुक्यातील उद्योगपतीने थेट केंद्र सरकारकडे जाऊन केवळ सांगोल्याचा नव्हे, तर देशातील प्रत्येक शेतकरी व पशुपालकाचा प्रश्न मांडला, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.”
यावेळी विजयसिंह सुरवसे यांनी सांगितले की, सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत सेक्स सॉर्टेड सिमेनचे दर अत्यंत जास्त आहेत. काही ठिकाणी हे दर २,००० रुपयांपासून थेट ४०,००० रुपयांपर्यंत असल्यामुळे सर्वसामान्य पशुपालकांना हे तंत्रज्ञान परवडत नाही. परिणामी, पारंपरिक सिमेनचा वापर करावा लागतो, ज्याचे दरही १,००० रुपयांपेक्षा कमी नाहीत. त्यामुळे बहुतांश वेळा नर वासरांचाच जन्म होऊन पशुपालकांवर आर्थिक ओझे वाढते.
तसेच, जनावरांचे आरोग्य राखण्यासाठी त्यांना वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे.थेलेरिया आणि इतर आजारांविरुद्ध लसीकरण करणे देखील अनिवार्य आहे, परंतु ही लस बाजारात सहज उपलब्ध नाही. यामुळे पशुधन मालकांना अनेक समस्या निर्माण होतात. जर ही लस कमी किमतीत उपलब्ध असती तर पशुधन मालकांना खूप मदत होते. म्हणून, शेतकरी आणि पशुधन मालकांच्यावतीने, मी या संदर्भात त्वरित आणि संवेदनशील निर्णय घ्यावी अशी मागणी केली आहे.
नर वासरांचे संगोपन, चारा-पाणी, तसेच विक्रीपर्यंतचा खर्च पशुपालकांसाठी मोठी अडचण ठरत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी उत्तम दर्जाचे सेक्स सॉर्टेड सिमेन १०० ते ५०० रुपयांच्या दरात उपलब्ध करून देण्यात यावे, अशी ठोस मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. यामुळे अधिक दूध देणाऱ्या गाई मिळून पशुपालकांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
तसेच, आधुनिक एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञान सध्या महाग असल्याने ते सर्वसामान्य पशुपालकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानासाठी सरकारी अनुदान किंवा आर्थिक सहाय्य वाढवावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यामुळे देशी व उच्च प्रतीच्या गाईंच्या पैदाशीस चालना मिळेल, असा विश्वास विजय सुरवसे यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने पशुपालकांच्या या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून सेक्स सॉर्टेड सिमेन व एम्ब्रियो तंत्रज्ञान स्वस्त, सुलभ व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
