शिस्त की अत्याचार? विद्यार्थ्यांना बेल्टने मारहाण, शिक्षण व्यवस्थेवर सवाल?
विशेष प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात सध्या गंभीर आणि संतापजनक प्रकार सुरू असल्याचा आरोप समोर आला असून, त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. शिक्षणाच्या पवित्र मंदिरातच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी, मानसिकतेशी आणि भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप पालक, विद्यार्थी आणि काही शिक्षकांनी केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी गुरु-शिष्य नात्याला तडा देणारे प्रकार या संस्थेत घडले आहेत. काही शिक्षक चक्क मद्यपान करून शाळेत येतात, असा धक्कादायक आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर एका कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना चक्क बेल्टने मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, ही अमानुष मारहाण कितपत योग्य आहे, असा थेट सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थी एखाद्या कार्यक्रमात आनंद व्यक्त करत असतील, तर त्यांच्या आनंदात विरजण घालून “तुम्ही आनंद का साजरा करता?” असे म्हणत बेल्टने मारहाण करणे ही कोणत्या शिक्षणपद्धतीत बसते, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. मारहाणीनंतर संबंधित विद्यार्थ्यांना दमदाटी करून शैक्षणिक नुकसान करण्याच्या धमक्या दिल्याचेही गंभीर आरोप समोर आले आहेत. हे प्रकार म्हणजे सरळसरळ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ असल्याचे बोलले जात आहे.
संस्थेच्या सचिवांच्या कारभारात लोकांचा बळी
“स्वतःच्या चुका, गैरप्रकार आणि अपयश झाकून ठेवून इतरांना कसे त्रास देता येईल, कसे लुबाडता येईल, याचाच विचार या संस्थेच्या सचिवांच्या कारभारात दिसतो,” असा गंभीर आरोप पालक व काही शिक्षकांनी केला आहे. विशेष म्हणजे, स्वतःच्या स्वार्थासाठी काही शिक्षकांना बळी देण्याचा प्रकारही सुरू असल्याचे बोलले जात आहे.
या साऱ्या प्रकरणात संस्थेच्या उच्चशिक्षित अध्यक्षांनी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिक्षणाच्या न्याय मंदिरात चुकीच्या गोष्टींना थारा दिला जात असेल, तर तो आबासाहेबांच्या विचारांना व तत्त्वांना थेट धक्का ठरणार नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकरणात तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पालक व विद्यार्थी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देत आहेत. In Public News शी बोलताना शिक्षकांनी “शिक्षण वाचवायचं असेल, तर आत्ताच हस्तक्षेप गरजेचा आहे,” अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
