गाजावाजा नाही, परिणाम आहेत! ‘न कळलेलं’ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांचं समाजाशी असलेल नात!
भाग २ : इन पब्लिक न्यूज वाढदिवस विशेष लेख :
आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख… नाव उच्चारताच अनेकांच्या डोळ्यांसमोर अजूनही ‘नवं’ नेतृत्व उभं राहतं. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख हे स्वर्गीय आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख यांचे नातू. बाबासाहेब देशमुख यांच्या सुसंस्कृत, विचारप्रधान घराण्यात जन्मलेलं हे नेतृत्व समाजकारण–राजकारणाचा समृद्ध वारसा घेऊन आलं आहे. तरीही, “आबासाहेबांची सेवा” वारशाने मिळते, हा गैरसमज त्यांनी कधीही पोटात बाळगला नाही—कामातूनच उत्तर देण्याचा त्यांचा स्वभाव आहे.

शिक्षणाचा प्रवासच त्यांच्या शिस्तीचा आणि चिकाटीचा आरसा आहे. पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पेनूर; पाचवी ते दहावी सैनिक स्कूल, तुळजापूर; अकरावी–बारावी दयानंद कॉलेज, लातूर; एमबीबीएस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, छत्रपती संभाजी नगर; एमडी (मेडिसिन) डी. वाय. पाटील, कोल्हापूर; आणि सुपर स्पेशालिटी—कार्डिओलॉजी, कलकत्ता. उच्चविद्याविभूषित आमदार सांगोला तालुक्याला लाभला—हे केवळ अभिमानाचं नाही, तर जबाबदारीचंही लक्षण आहे.
शांत, संयमी आणि तितकेच संवेदनशील—असं नेतृत्व अनेकांना अजून ‘कळलेलं’ नाही. कारण हा नेता गाजावाजा करत नाही; तो काम करतो. स्व. गणपतराव देशमुख साहेबांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या तुलनेत बाबासाहेब राजकारणात नवखे असतील; पण गेल्या तीन वर्षांच्या सक्रिय कार्यकाळात आणि सुमारे वर्षभराच्या आमदारकीत त्यांनी तालुक्याचा इंचन्इंच पिंजून काढला आहे. कार्यकर्त्यांचं जाळं अचूकपणे विणत, प्रश्न समजून घेत, उत्तर शोधत—कामाची चुणूक त्यांनी ठामपणे दाखवली आहे.
विधानसभा सभागृहात सांगोला मतदारसंघासह राज्यातील अनेक प्रश्नांची त्यांनी स्पष्ट, मुद्देसूद मांडणी केली. घोषणांच्या पलीकडे जाऊन, निर्णयांपर्यंत सरकारला नेणारी भूमिका घेतली. परिणाम? सकारात्मक निर्णय, ठोस हस्तक्षेप आणि प्रशासनाला जबाबदार धरण्याची राजकीय भाषा.
आज त्यांचा वाढदिवस. राजकारणाला माणुसकीची धार देणाऱ्या या नेतृत्वाच्या हातून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दीनदलित, उपेक्षित, वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी आयुष्यभर कार्य घडत राहो—हीच अपेक्षा. दीर्घायुष्य लाभो; धैर्य, संयम आणि संवेदनशीलतेचा हा प्रवास अधिक भक्कम होवो
इन पब्लिक न्यूजकडून डॉ. बाबासाहेब देशमुख आपणांस मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा!


